७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:55 IST2025-08-26T18:52:10+5:302025-08-26T18:55:02+5:30
सात मुलांची आई असलेल्या एका महिलेने आपल्याच २२ वर्षांच्या भाच्यासोबत पळून जाऊन लग्न केले.

७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील महराजगंज कोतवाली क्षेत्रातील पुरे अचली गावात, सात मुलांची आई असलेल्या एका महिलेने आपल्याच २२ वर्षांच्या भाच्यासोबत पळून जाऊन लग्न केले. या घटनेनंतर पीडित पतीने आपल्या सात मुलांसह पोलीस ठाण्यात धाव घेत पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार पासी असे पतीचे नाव असून तो सध्या दिल्लीत माळीचे काम करतो. राजकुमारने २ ऑगस्ट रोजी आपली पत्नी लालतीला ३ लाख रुपये रोख देऊन गावी पाठवले होते, जेणेकरून गावातील बांधकाम सुरू असलेल्या घराचे छत पूर्ण करता येईल.
पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेल्याचे उघड
एक आठवडा उलटूनही जेव्हा घरात काहीच काम झाले नाही, तेव्हा राजकुमारने गावी आपल्या भावांशी संपर्क साधला. त्यावेळी त्याला कळले की, पत्नी लालती गावात पोहोचलेलीच नाही आणि घरासाठी कोणतेही बांधकाम साहित्यही खरेदी करण्यात आलेले नाही.
यानंतर राजकुमारने नातेवाईकांशी संपर्क साधला असता, त्याला कळले की त्याची पत्नी लालती हैदरगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवैचा गावात राहत आहे. लालती दुसऱ्या कोणासोबत नसून, तिच्या २२ वर्षांच्या भाच्यासोबत, उदयराजसोबत त्याच्या घरी राहत होती.
पती राजकुमार काही नातेवाईकांसह देवैचा गावात पोहोचला, तेव्हा पत्नीने त्याला स्पष्ट सांगितले की, तिने उदयराजसोबत कोर्ट मॅरेज केले असून आता तिला त्याच्यासोबतच राहायचे आहे. पतीने मुलांचे भविष्य आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार करण्यास सांगितले. मात्र, तिने "आता मुलांशी माझा काहीही संबंध नाही," असे धक्कादायक उत्तर दिले.
पोलिसांची पुढील कारवाई सुरू
या घटनेमुळे निराश झालेल्या पतीने अखेर आपल्या सात मुलांसह महराजगंज पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पत्नीविरोधात तक्रार दाखल केली. या संदर्भात, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रार दाखल करून घेण्यात आली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.