"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:19 IST2026-01-01T14:16:52+5:302026-01-01T14:19:02+5:30
दूषित पाण्यामुळे एका पाच महिन्यांच्या निष्पाप बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे एका पाच महिन्यांच्या निष्पाप बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. बाळाच्या नातेवाईकांनी प्रशासन आणि महानगरपालिकेवर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत. साहू कुटुंबाचं म्हणणं आहे की, परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून घाणेरडा आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत होता. याबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या गेल्या, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. याच दूषित पाण्यामुळे पाच महिन्यांच्या मुलाचा बळी गेला.
मुलाला उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला होता, त्यानंतर त्याची प्रकृती सतत बिघडत गेली. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टर त्याचा जीव वाचवू शकले नाहीत. चिमुकल्याच्या मृत्यूनंतर आई साधना साहू यांची रडून-रडून वाईट अवस्था झाली आहे. त्यांनी सांगितलं की, "जवळपास दहा वर्षांच्या नवसानंतर आणि प्रार्थनेनंतर आम्हाला मुलगा झाला होता."
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
"गर्भधारणेदरम्यान गंभीर प्रसूती समस्या होत्या, ज्यामुळं नऊ महिने बेड रेस्ट घ्यावी लागली होती. दूध कमी येत असल्याने बाहेरून दूध आणून बाळाला पाजावं लागत असे, ज्यामध्ये पाणी मिसळलं जायचं. तेच पाणी त्यांच्या बाळासाठी जीवघेणं ठरलं." या कुटुंबाने असाही आरोप केला आहे की, १० वर्षांच्या मुलीलाही सतत पोटदुखी आणि पोटाशी संबंधित त्रास होत आहेत.
यावरून हे स्पष्ट होतं की, परिसरातील पाणी लोकांच्या आरोग्यासाठी घातक बनले आहे. "माझं बाळ गेलं, पण माहिती नाही आणखी किती निष्पाप जीव यामुळे धोक्यात येती," अशी भीती आईने व्यक्त केली. आरोग्य विभागाची आकडेवारीही परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करत आहे. विभागाच्या माहितीनुसार, दूषित पाण्यामुळे आतापर्यंत १४९ जण आजारी पडले आहेत, ज्यांना उलट्या-जुलाब आणि पोटाशी संबंधित तक्रारी आहेत. यापैकी आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.