Video - टीम जिंकली पण 'तो' हरला, क्रिकेटर मैदानावरच कोसळला, शेवटचा बॉल टाकला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 10:43 IST2025-10-13T10:38:37+5:302025-10-13T10:43:37+5:30
एका क्रिकेट सामन्यात शेवटचा बॉल टाकल्यानंतर खेळाडूची अचानक तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला.

फोटो - आजतक
मुरादाबादच्या बिलारी ब्लॉकमध्ये झालेल्या एका क्रिकेट सामन्यात शेवटचा बॉल टाकल्यानंतर खेळाडूची अचानक तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. बिलारीतील एका मैदानावर ही धक्कादायक घटना घडली. उत्तर प्रदेश वेटरन्स क्रिकेट असोसिएशनने ही टूर्नामेंट आयोजित केली होती.
रविवारच्या सामन्यात मुरादाबाद आणि संभल या टीम एकमेकांसमोर आल्या. मुरादाबादने प्रथम बॅटींग केली होती आणि संभलची टीम टार्गेटचा पाठलाग करत होती. शेवटच्या चार बॉलमध्ये १४ रन्सची आवश्यकता होती. मुरादाबादचा वेगवान बॉलर अहमर खानने एक ओव्हर टाकली आणि त्याच्या टीमला ११ रन्सनी विजय मिळवून दिला.
मुरादाबाद के मशहूर खिलाड़ी अहमर ख़ान का अंतिम सफ़र pic.twitter.com/i8irKcIWPf
— Navaid Siddiqui (@NavaidSiddiqui8) October 13, 2025
अहमर खानने शेवटचा बॉल टाकताच, अचानक त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तो मैदानावर कोसळला. सहकारी खेळाडू घाबरले आणि त्यांनी ताबडतोब त्याच्याकडे धाव घेतली आणि उपस्थित डॉक्टरांनी मैदानावर सीपीआर देण्यास सुरुवात केली. तो काही काळासाठी बरा झाला, त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आलं.
रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी अहमर खानला मृत घोषित केलं. सामना जिंकल्याचा आनंद शोकात बदलला. सहकारी खेळाडू आणि कुटंबीयांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे. अहमर खान स्थानिक मुरादाबाद संघाचा अनुभवी बॉलर होता आणि अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळत होता अशी माहिती त्याच्या काही मित्रांनी दिली. स्पर्धेच्या आयोजकांनी शोक व्यक्त केला आहे.