राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात वयाच्या ७५ वर्षांनंतर इतरांना संधी द्यायला हवी, असे म्हटले होते. या वक्तव्यावरून विरोधकांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्यास सुरुवात केली आहे.
सरसंघचालकांनी संघाचे वरिष्ठ अधिकारी मोरोपंत पिंगळे यांचे त्यांच्या जीवनावर आधारित एका इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात स्मरण केले. यावेळी त्यांनी सांगितले की, वृंदावनमध्ये झालेल्या संघाच्या बैठकीत मोरोपंत पिंगळे यांच्या ७५ व्या वर्षाबद्दल त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन सरकार्यवाह शेषाद्री यांनी मोरोपंतांना शाल घालून सन्मानित केले. त्यावेळी मोरोपंत म्हणाले होते की, मला ७५ चा अर्थ समजतो. जेव्हा एखाद्या नेत्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर शाल पांघरली जाते तेव्हा त्याचा एक अर्थ असतो. याचा अर्थ तो म्हातारा झाला आहे. तुम्ही इतरांना संधी दिली पाहिजे.
भागवत यांच्या या विधानावर काँग्रेसने संधी साधली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, 'पंतप्रधान मोदी परत येताच त्यांना सरसंघचालकांनी आठवण करून दिली की ते १७ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ वर्षांचे होतील. पण पंतप्रधान सरसंघचालकांना देखील असे सांगू शकतात. तेही ११ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ वर्षांचे होतील! एक बाण, दोन निशाणे!' असे म्हटले आहे.
संजय राऊत यांनी देखील यावर भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदींनी अडवाणी, मुरली मनोहर, जसवंत सिंह यांसारख्या मोठ्या नेत्यांना निवृत्त होण्यास भाग पाडले होते. आता मोदी स्वत: ते पाळतात की नाही ते पाहुया, असा टोला राऊतांनी लगावला होता.