अवकाश युद्धाचं सावट? मोदी सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 18:12 IST2019-06-11T18:11:45+5:302019-06-11T18:12:43+5:30
अवकाश युद्धाच्या दृष्टीनं मोठं पाऊल

अवकाश युद्धाचं सावट? मोदी सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली: अमेरिकेनंतर आता भारतानंदेखील अवकाश युद्धाची (स्पेस वॉर) तयारी सुरू केली आहे. सैन्याचं सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकारनं नव्या संस्थेच्या स्थापनेला मंजुरी दिली हे. संरक्षण अंतराळ संशोधन संस्था (डीएसआरओ) असं या संस्थेचं नाव आहे. उच्च क्षमतेची हत्यारं आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम डीएसआरओ करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील सुरक्षेसाठीच्या कॅबिनेट समितीनं डीएसआरओच्या स्थापनेला मंजुरी दिल्याचं संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी एएनआयला वृत्तसंस्थेला सांगितलं. अंतराळाशी क्षेत्राशी संबंधित अत्याधुनिक हत्यारं आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम ही संस्था करेल. 2020 पर्यंत अंतराळ दलाची निर्मिती करण्याची घोषणा याआधीच अमेरिकेकडून करण्यात आली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीन अस्वस्थ आहे. त्यामुळे लवकरच चीनकडूनही याबद्दल मोठी घोषणा केली जाऊ शकते.
संरक्षण अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेचा निर्णय सरकारनं नुकताच घेतल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली. या संस्थेला आकार देण्यासाठी वेगानं पावलं उचलली जात आहेत. या संस्थेला लवकरच वैज्ञानिकांचं एक पथक दिलं जाईल. हे पथक तिन्ही दलांसोबत मिळून काम करेल. ही संस्था संरक्षण अंतराळ संस्थेला (डीसीए) संशोधन आणि विकासात सहकार्य करेल. डीसीएमध्ये तिन्ही दलांचे सदस्य आहेत.