६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 10:27 IST2025-05-21T10:26:15+5:302025-05-21T10:27:06+5:30
Spy Jyoti Malhotra: पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी सीमावर्ती भागांचे व्हिडिओ बनवणे आणि काश्मीरला भेट देण्याबद्दल ज्योतीला प्रश्न विचारण्यात आले.

६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?
Spy Jyoti Malhotra: हरयाणाची ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना संवेदनशील माहिती दिल्याच्या प्रकरणात पकडलेल्या सहा भारतीय नागरिकांमध्ये तिचा समावेश आहे. राष्ट्रीय तपास संस्था, गुप्तचर विभाग आणि लष्करी गुप्तचर अधिकारी ज्योती मल्होत्राची चौकशी करत आहेत. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. तपास यंत्रणांनी ज्योतीची ६ तास कसून चौकशी केली. परंतु, यावेळी काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देता अली नसल्याचे सांगितले जात आहे.
ज्योती ही भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या संपर्कात होती. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ज्योतीला 'महत्त्वाची व्यक्ती' म्हणून विकसित करत होते. ज्योतीचा लष्करी कारवायांशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी थेट संबंध किंवा प्रवेश नव्हता. परंतु तरीही ती थेट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या (पीआयओ) संपर्कात होती.
६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती, परदेशातून व्यवहार
मिलिटरी इंटेलिजन्सने ज्योतीची सहा तास कसून चौकशी केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी सीमावर्ती भागांचे व्हिडिओ बनवणे आणि काश्मीरला भेट देण्याबद्दल ज्योतीला प्रश्न विचारण्यात आले. ज्योतीने पहलगाम प्रकरणाशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले आहे. तसेच काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देता आली नसल्याचे म्हटले जात आहे. ज्योतीची अनेक बँकांमध्ये खाती आढळली आहेत. या खात्यांमध्ये परकीय चलनातही व्यवहार झालेत. या खात्यांमधील एकूण किती रक्कम आहे, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, ज्योतीच्या लॅपटॉपचे फॉरेन्सिक विश्लेषण केले जात आहे. ज्योतीच्या आर्थिक व्यवहारांची व प्रवासाच्या तपशीलांची चौकशी सुरू आहे. तिने पाकिस्तान, चीन व इतर काही देशांना भेटी दिल्याचे वृत्त आहे. कोणत्या देशांना, कोणत्या क्रमाने तिने भेट दिली हे पाहण्यासाठी घटनांची संपूर्ण साखळी आखण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्पन्नाचे ज्ञात स्रोत व प्रवास याचा मेळ बसत नाही.