कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीच्या प्रश्नावर उद्या दिल्लीत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 16:56 IST2026-03-16T16:54:47+5:302026-03-16T16:56:42+5:30
महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या राज्यांनी कर्नाटकाविरोधात केंद्राकडे तक्रार केली

संग्रहित छाया
शिरगुप्पी : बेळगाव, विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अलमट्टी जलाशयाच्या उंचीवाढीच्या प्रश्नावर कर्नाटक सरकारने ठाम भूमिका घेतली आहे. या संदर्भात मंगळवार, दि. १७ मार्च रोजी दिल्लीतीलकर्नाटक भवनात राज्यातील खासदारांची बैठक आयोजित केली असून, या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.
बागलकोट येथे शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात डी. के. शिवकुमार म्हणाले, राज्यातील खासदारांनी केंद्र सरकारवर दबाव आणून अलमट्टी जलाशयाच्या उंचीवाढीबाबत स्पष्ट भूमिका मांडावी. सध्या महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या राज्यांनी कर्नाटकाविरोधात केंद्राकडे तक्रार केली असून, या पार्श्वभूमीवर जलशक्ती मंत्रालयातील मंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
राज्याच्या वाट्याचे पाणी पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी अलमट्टी जलाशयाची उंची वाढवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंगळवारी होणाऱ्या बैठकीसाठी डी. के. शिवकुमार दिल्लीला रवाना होणार असून खासदारांसोबत चर्चा करून पुढील पावले निश्चित केली जाणार आहेत.