दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 11:34 IST2025-10-02T11:33:38+5:302025-10-02T11:34:21+5:30
रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवरून भाजपाचे दोन नगरसेवक आपापसात भिडले. त्यांच्यात हाणामारी झाली.

फोटो - आजतक
मेरठच्या सूरजकुंड भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवरून भाजपाचे दोन नगरसेवक आपापसात भिडले. त्यांच्यात हाणामारी झाली. परिस्थिती आणखी बिकट झाली आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी नगरसेवक उत्तमचंद सैनी आणि त्यांच्या समर्थकांना अटक केली आणि त्यांना सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात नेलं.
पोलीस ठाण्यात समर्थकांनी गोंधळ घातला. लॉकअपमध्ये ठेवण्यात आल्याने नाराज नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी केली. त्यानंतर काही वेळातच भाजपा कॅन्टचे आमदार अमित अग्रवाल त्यांच्या समर्थकांसह आले आणि त्यांनी नगरसेवकांना लॉकअपमधून सोडण्याची मागणी केली.
पोलिसांनी नकार दिल्यावर, स्टेशनमध्ये पोलीस आणि भाजप समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची आणि किरकोळ हाणामारी झाली आणि विरोधात घोषणा देण्यात आल्या. या गोंधळादरम्यान पोलीस ठाण्यातील वातावरण तणावपूर्ण राहिलं.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक (शहर) आयुष विक्रम सिंह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आमदार अमित अग्रवाल आणि भाजप अधिकाऱ्यांना निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती शांत झाली. पोलीस अधीक्षक (शहर) आयुष विक्रम सिंह सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.