पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 11:05 IST2026-04-11T11:04:04+5:302026-04-11T11:05:35+5:30
Mathura Boat Tragedy : उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे यमुना नदीत पीपा पुलाजवळ पर्यटकांनी भरलेली बोट उलटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे.

फोटो - ndtv.in
उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे यमुना नदीत पीपा पुलाजवळ पर्यटकांनी भरलेली बोट उलटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील एका कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीत ३० हून अधिक भाविक होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जगराओं येथील मोगा येथील 'हंस' कुटुंब आपल्या नातेवाईकांसह ९ एप्रिल रोजी वृंदावनला फिरण्यासाठी गेलं होतं. १० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता ते वृंदावनला पोहोचले होते. अपघाताच्या वेळी कुटुंबातील सदस्य दोन वेगवेगळ्या बोटीमध्ये बसले होते. एका बोटमध्ये सपना हंस, रीमा हंस आणि सरोज राणी होत्या, तर दुसऱ्या बोटमध्ये अनिल हंस आणि त्यांची पुतणी नेहा हंस इतर लोकांसह बसले होते. दुर्घटनेत सपना हंस (वय अंदाजे ५०-५५ वर्षे) यांचा मृत्यू झाला.
अनिल यांच्या डोळ्यासमोरच बोट उलटली
रीमा हंस आणि सरोज राणी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुसऱ्या बोटवर असलेले अनिल हंस आणि नेहा हंस सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. हा अपघात कुटुंबासाठी मोठा धक्का आहे कारण ८ एप्रिल रोजीच सपना हंस आणि अनिल हंस यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. अनिल यांच्या डोळ्यासमोरच बोट उलटली, पत्नी बुडत होती पण ते काहीच मदत करू शकले नाहीत. सपना यांचा यामध्ये मृत्यू झाला. कुटुंबावर काळाने घाला घातला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील इतर सदस्य मोगा येथून वृंदावनसाठी रवाना झाले आहेत.
मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
मथुरा यमुना नदी दुर्घटनेशी संबंधित व्हिडीओ दुर्घटनेच्या काही वेळापूर्वीचा आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, बोटीमध्ये अनेक लोक बसून आनंद घेत आहेत. सर्व भाविक देवाच्या भक्तीत तल्लीन असल्याचंही यात दिसत आहे. भजन गाणाऱ्या या भाविकांना पुढे काय भयंकर घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही नव्हती. भजन-कीर्तन सुरू असतानाच अचानक ही बोट यमुना नदीत उलटली.