आंध्र प्रदेशात ONGC पाइपलाइनमधून गॅसगळतीनंतर भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:55 IST2026-01-05T17:53:29+5:302026-01-05T17:55:39+5:30
भीषण आग पसरताच जवळपासची गावे रिकामी केली.

आंध्र प्रदेशात ONGC पाइपलाइनमधून गॅसगळतीनंतर भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण
कोनसीमा: आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यात ONGCच्या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात गॅसगळती झाल्यानंतर भीषण आग लागली. ही घटना मलिकिपुरम गावातील इरुसमांडा परिसरात घडली असून, आग आणि दाट धुरामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने अनेक गावांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
गॅसगळतीनंतर आग; परिसर धुराच्या विळख्यात
मिळालेल्या माहितीनुसार, ONGC च्या पाइपलाइनमधून अचानक मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडू लागला. काही क्षणांतच या गॅसला आग लागली आणि आगीने वेगाने रौद्र रूप धारण केले. दाट धुरामुळे आसपासची गावे धुराच्या विळख्यात सापडली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ ONGC अधिकाऱ्यांना कळवले.
शेकडो नारळाची झाडे जळून खाक
या आगीत परिसरातील शेकडो नारळाची झाडे जळून खाक झाली आहेत. माहितीनंतर ONGC चे कर्मचारी आणि तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमारे दहा दिवसांपूर्वी एका खासगी कंपनीने या गॅस साठ्यांच्या ठिकाणी काम सुरू केले होते.
Dr. Ambedkar Konaseema District, Andhra Pradesh | A massive gas leak occurred in Irusumanda village of Malkipuram mandal. Local residents informed ONGC officials about the incident. ONGC officials, along with fire and police personnel, are dousing the fire. Villagers are in a…
— ANI (@ANI) January 5, 2026
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू घेतला आढावा
या गॅस दुर्घटनेची माहिती मिळताच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना राहत व बचावकार्य वेगाने राबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, धोकादायक परिसरातील नागरिकांना त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, गॅसगळतीच्या पार्श्वभूमीवर आसपासच्या गावांमध्ये लाऊडस्पीकरद्वारे सतर्कतेच्या सूचना दिल्या जात असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
धमाका होताच परिसरात गोंधळ
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पाइपलाइनमधून गॅसगळती सुरू होताच जोरदार धमाका झाला आणि संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. घटना घडली, तेव्हा ONGC च्या विहिरीवर तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरू होते. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
तीन गावांचा वीज व गॅस पुरवठा खंडित
सुरक्षेच्या दृष्टीने आसपासच्या तीन गावांमधील वीज आणि गॅस पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ONGC ची विशेष टीम घटनास्थळी तैनात असून, गळती थांबवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.