'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 14:22 IST2025-07-03T14:20:05+5:302025-07-03T14:22:32+5:30
नवरीच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. स्वयंपाकी बोलावले गेले, जेवण बनवण्यास सुरुवात झाली, आणि पाहुणे देखील येऊ लागले. पण..

'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच...
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील नवाबगंज पोलिस स्टेशन हद्दीतील ऐंड जागीर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नूरी नावाच्या तरुणीच्या आयुष्यात एका क्षणात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हरहरपूर मटकली येथील सलमान नावाच्या तरुणासोबत तिचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही एकमेकांना लग्न करण्याचे वचन दिले होते आणि त्यांच्या प्रेमाची चर्चा गावात सर्वत्र होती.
लग्नाचे वचन, अचानक विश्वासघात
२८ जून रोजी सलमान नूरीला घेऊन पळून गेला. यानंतर नूरीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या दबावामुळे, २९ जून रोजी सलमानच्या कुटुंबीयांनी नूरीला पोलीस स्टेशनमध्ये आणले. या प्रकरणाची पंचायतीमध्ये चर्चा झाली, जिथे दोन्ही कुटुंबांतील वडीलधाऱ्यांनी २ जुलै रोजी दोघांचे रीतसर लग्न लावण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानंतर नूरीच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. स्वयंपाकी बोलावले गेले, जेवण बनवण्यास सुरुवात झाली, आणि पाहुणे देखील येऊ लागले. नूरीने वधूचा पोशाख परिधान केला होता, तिच्या हातावर सुंदर मेहंदी सजली होती. सर्वजण वरातीत सामील होण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, संध्याकाळ जसजशी पुढे सरकू लागली, तसतशी सर्वांची अस्वस्थता वाढू लागली.
वधू लग्नाच्या पोशाखात पोलीस स्टेशनमध्ये!
लग्नाचा मुहूर्त टळून गेला तरी सलमानकडून कोणतीही बातमी आली नाही. वरात आली नाही, आणि सलमानही आला नाही. नूरीचे डोळे दाराकडेच लागून राहिलेले, पण तिला आपली फसवणूक झाल्याचे जाणवत होते. रात्री उशिरापर्यंत सलमानकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने नूरी खचून गेली.
आपल्या लग्नाच्या पोशाखात, मेहंदीच्या हातांनीच नूरी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. पोलीस स्टेशनमध्ये बसून ती रडू लागली आणि पोलिसांना विनंती करू लागली की, "सलमानने माझ्याशी लग्न करावे अन्यथा त्याला तुरुंगात पाठवावे. त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे." पोलिसांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु नूरी आपल्या निर्णयावर ठाम होती. तिने स्पष्टपणे सांगितले की, सलमानने तिच्याशी लग्न केले तरच ती शांत होईल, अन्यथा त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात पाठवले जावे.
"आता मला कोण स्वीकारेल?"
या विश्वासघातामुळे नूरी पूर्णपणे खचून गेली आहे. ती म्हणाली, "मी आणि सलमान दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतो. मी त्याच्यावर खूप प्रेम केले. मी त्याच्यावर विश्वास ठेवून सर्व काही सोडले होते. आता त्याने माझ्याकडे पाठ फिरवली आहे. माझ्या संपूर्ण गावात माझी बदनामी होत आहे. माझे कुटुंबीयही मला टोमणे मारत आहेत की, 'आता तुला कोण स्वीकारेल?'" हे सांगताना नूरीचे अश्रू थांबत नव्हते. ती वारंवार पोलिसांना सांगत होती, "माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. आता सलमानने माझ्याशी लग्न करावे, नाहीतर कायद्याने त्याला शिक्षा करावी."
पुढील तपास सुरू
सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी सांगितले की, तपासानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.