काँग्रेसने बरेलीमध्ये आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये चेंगराचेंगरी, अनेक मुली जखमी, नेते म्हणाले, ‘वैष्णौदेवीमध्ये चेंगराचेंगरी होऊ शकते मग, ही तर मुलींची गर्दी होती’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 15:23 IST2022-01-04T15:21:19+5:302022-01-04T15:23:23+5:30
Uttar Pradesh Assembly Election 2022: सोमवारी उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये काँग्रेच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या लडकी हूँ, लड सकती हूँ अभियानांतर्गत मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

काँग्रेसने बरेलीमध्ये आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये चेंगराचेंगरी, अनेक मुली जखमी, नेते म्हणाले, ‘वैष्णौदेवीमध्ये चेंगराचेंगरी होऊ शकते मग, ही तर मुलींची गर्दी होती’
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. दरम्यान, सोमवारी उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये काँग्रेच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या लडकी हूँ, लड सकती हूँ अभियानांतर्गत मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनदरम्यान, चेंगराचेंगरी होऊन अनेक मुली चिरडल्या गेल्या. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या एका महिला नेत्याने, हा मानवी स्वभाव असल्याचे सांगितले.
सोमवारी बरेलीमधील बिशप मंडल इंटर कॉलेजच्या मैदानामध्ये सकाळी १० वाजता या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही शर्यत प्रियंका गांधींच्या लडकी हूँ लड सकती हूँ मोहिमेंतर्गत आयोजित करण्यात आली होती. मात्र शर्यतीला सुरुवात झाल्यावर पुढे धावत असलेल्या मुली धक्का लागल्याने खाली पडल्या. त्यानंतर मागून येणाऱ्या मुलींनी त्यांना चिरडले. त्यामुळे आरडाओरडा सुरू झाला. तसेच अनेक मुली जखमी झाल्या.
#WATCH | Stampede occurred during Congress' 'Ladki hoon, Lad Sakti hoon' marathon in Bareilly, Uttar Pradesh today pic.twitter.com/nDtKd1lxf1
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 4, 2022
चेंगराचेंगरीत जखमी झाल्यानंतर किमान तीन स्पर्धकांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तपास सुरू केला. तर या चेंगराचेंगरीबाबत काँग्रेसच्या महिला नेत्या आणि माजी महापौर सुप्रिया ऐरन यांनी सांगितले, की, वैष्णौदेवी मंदिरात चेंगराचेंगरी होऊ शकते मग ही तर मुलींची गर्दी आहे, हा मानवी स्वभाव आहे. मात्र प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांना झालेल्या धक्काबुक्कीबाबत मी माफी मागते. तसेच हे एक कारस्थान अशू शकते. काँग्रेसच्या वाढत असलेल्या जनाधारामुळे अशाप्रकारचे कारस्थान रचले जाऊ शकते.
दरम्यान, अशाप्रकारे एका मॅरेथॉन २८ डिसेंबर रोजी राज्याची राजधानी असलेल्या लखनौमध्ये आयोजित करण्यात आली होती. यूपीसीसी अध्यक्ष अजयकुमार लल्लू आणि युवा काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत महिलांनी पाच किमी लांब मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. मेरठमध्ये प्रगतीशील समाजवादी पक्षाच्या चादर वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली होती.