Crime: पुतळ्यावर अंत्यसंस्कार करून विम्याचे ५० लाख हडपण्याचा प्रयत्न; एका चुकीमुळे फसले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:10 IST2025-11-28T10:09:25+5:302025-11-28T10:10:23+5:30
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात पुतळ्यावर अंत्यसंस्कार करून विम्याचे ५० लाख हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक झाली.

Crime: पुतळ्यावर अंत्यसंस्कार करून विम्याचे ५० लाख हडपण्याचा प्रयत्न; एका चुकीमुळे फसले!
उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील गढमुक्तेश्वर येथील ब्रजघाट गंगानगरी स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी अत्यंत खळबळजनक घटना घडली. या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणलेला मृतदेह प्रत्यक्षात प्लास्टिकचा पुतळा असल्याचे उघडकीस आल्याने लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. विम्याने ५० लाख रुपये हडपण्यासाठी दोन तरुणांनी हा कट रचला. परंतु, स्मशानभूमीतील नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सत्य उजेडात आले. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील पालम येथे राहणारा कापड व्यापारी कमल सोमाणी याच्यावर सुमारे ५० लाख रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने एक योजना आखली. कमलने त्याच्या दुकानात काम करणाऱ्या नीरजचा भाऊ अंशुल याच्या आधार आणि पॅन कार्डचा गैरवापर केला आणि त्याच्या नावाने टाटा एआयजीकडून ५० लाख रुपयांची जीवन विमा पॉलिसी काढली. संशय येऊ नये म्हणून त्याने स्वतःच या पॉलिसीचे हप्ते भरले. त्यानंतर त्याचा मित्र आशिष खुराणा याच्या मदतीने अंशुलसारखा हुबेहूब प्लास्टिकचा पुतळा तयार केला. दोघांनी या पुतळ्याला कपड्यात गुंडाळले आणि गाडीने ब्रजघाट स्मशानभूमीत नेले. या पुतळ्यावर अंत्यसंस्कार करायचे आणि दहन प्रमाणपत्र मिळवून विमा कंपनीकडून ५० लाख रुपये उकळायचे, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता.
पुतळा चितेवर ठेवताच स्मशानभूमीत उपस्थित असलेल्या काही लोकांना काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. त्यांनी ताबडतोब मृतदेहावरचे कपडे बाजूला केले, तेव्हा आत प्लास्टिकचा पुतळा दिसला, हे पाहून सर्वांनाच धक्का बसला आणि स्मशानभूमीत गोंधळ निर्माण झाला. गोंधळामुळे घाबरलेल्या कमल आणि आशिष यांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, नागरिकांनी त्यांना पकडले आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गढमुक्तेश्वरचे निरीक्षक मनोज कुमार बलियान हे पथकासह स्मशानभूमीत दाखल झाले आणि त्यांनी कमल सोमाणी आणि आशिष खुराणा यांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर दिले. परंतु, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सांगितले की, विम्याने ५० लाख रुपये हडपण्यासाठी आरोपींनी हा कट रचला. परंतु, नागिरकांच्या सतर्कतेमुळे ५० लाख रुपयांची फसवणूक टळली. पोलिसांनी प्लास्टिकचा पुतळा, गुन्ह्यासाठी वापरलेली कार आणि सर्व बनावट कागदपत्रे जप्त केली. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.