कोलकाता : मतमोजणी केंद्रांवर कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला वाव नसल्याचा दावा पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अग्रवाल यांनी केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर मतदारसंघातील स्ट्राँग रूममध्ये कथित गैरप्रकारांची शक्यता व्यक्त केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी भूमिका स्पष्ट करीत गैरप्रकाराची शक्यता फेटाळून लावली.
स्ट्राँग रूममध्ये ठेवलेल्या ईव्हीएमवर २४ तास सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवली जात असून, सर्व व्यवस्था कडक असल्याने गैरप्रकाराची कोणतीही शक्यता नाही, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. “आरोप करण्यासाठी ठोस कारण आणि पुरावे आवश्यक असतात. सध्याचे आरोप निराधार आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना मतमोजणी केंद्रांवर सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्या निर्देशानुसार ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमवर कडक नजर ठेवली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
मतमोजणी केंद्राबाहेर सशस्त्र पोलिस दल तैनात उत्तर आणि पूर्व कोलकात्यातील अनेक मतदारसंघांची मतमोजणी होणाऱ्या खुदीराम अनुशीलन केंद्र येथे सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि सशस्त्र पोलिस दल तैनात केले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही व्यवस्था आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
राज्यमंत्री शशि पांजा यांनीही पारदर्शकतेची मागणी केली असून, गुरुवारी सायंकाळी या केंद्राबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले होते. ममता बॅनर्जी यांनीही गुरुवारी रात्री भवानीपूरमधील स्ट्राँग रूमला भेट देत मतमोजणी प्रक्रियेत छेडछाड होऊ नये, असा इशारा दिला होता. मतदानानंतरच्या साहित्याचे नियमानुसार वर्गीकरण सुरू असल्याचे आणि स्ट्राँग रूम पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता अत्यावश्यक आहे. जनतेचे मत सुरक्षित राहिले पाहिजे. तक्रारी मिळाल्यानंतर मी तातडीने येथे आले. तसेच मतमोजणी प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री
नेमका प्रकार काय?तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी रात्री ‘सखावत मेमोरिअल स्कूल’ येथील भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राला भेट दिली व मध्यरात्री १२:०० वाजून ७ मिनिटांपर्यंत चार तास त्या तेथेच होत्या. रात्री उशिरा पोस्टल मतपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करीत तृणमूल नेत्यांनी धरणे धरले व तेथे भाजप नेते आल्यानंतर तणाव निर्माण झाला.
Web Summary : Mamata Banerjee visited a strong room amid concerns about EVM tampering. Election officials deny irregularities, citing CCTV surveillance and tight security. TMC urges vigilance during vote counting. Security tightened at counting centers following allegations.
Web Summary : ईवीएम में छेड़छाड़ की आशंका के बीच ममता बनर्जी ने स्ट्रांग रूम का दौरा किया। चुनाव अधिकारियों ने सीसीटीवी निगरानी और कड़ी सुरक्षा का हवाला देते हुए अनियमितताओं से इनकार किया। टीएमसी ने मतगणना के दौरान सतर्कता बरतने का आग्रह किया। आरोपों के बाद मतगणना केंद्रों पर सुरक्षा बढ़ाई गई।