'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 20:53 IST2025-09-07T20:51:03+5:302025-09-07T20:53:34+5:30
Mallikarjun Kharge: पीएम मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा खराब केल्याचा आरोपही खरगेंनी केला.

'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
Mallikarjun Kharge: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी (७ सप्टेंबर २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक मोठे विधान केले आहे. अमेरिकेने भारतावर लादलेल्या शुल्काच्या संदर्भात बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना देशाचे शत्रू म्हटले. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मैत्री करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा खराब केल्याचा आरोपही केला. त्यांच्या या वक्तव्याने वाद वाढण्याची शक्यता आहे.
देशाचे वातावरण बिघडले
मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मित्र असू शकतात, परंतु पंतप्रधान मोदी देशाचे शत्रू बनले आहेत. त्यांनी संपूर्ण देशाचे वातावरण बिघडवले आहे. अमेरिकेने लादलेल्या करांचा भारतावर होणाऱ्या परिणामांवर खरगे म्हणाले, ट्रम्प यांनी भारतावर खूप मोठा कर लादला आहे. ५० टक्के कर लावून त्यांनी आपल्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे.
VIDEO | Kalaburagi: On US President Trump describing India-US ties as 'special’, Congress president Mallikarjun Kharge says, “PM Modi and Trump can be friends, but PM Modi is becoming an enemy of this country. A 50 per cent tariff has been imposed on us, and the lives of our… pic.twitter.com/ajf3hgzP9c
— Press Trust of India (@PTI_News) September 7, 2025
भारताची प्रतिष्ठा खराब केली
खरगेंनी मोदींना उद्देशून म्हटले की, तुम्ही तुमच्या देशातील नागरिकांचे रक्षण केले पाहिजे. कारण राष्ट्र प्रथम येते आणि त्यानंतर तुमची मैत्री येते. याशिवाय, त्यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली की, त्यांनी हे समजून घ्यावे की, भारत गेल्या अनेक दशकांपासून तटस्थता आणि अलिप्ततेचे परराष्ट्र धोरण अवलंबत आहे आणि त्याच मार्गाने पुढे जात राहावा. ट्रम्पशी उघडपणे मैत्री करुन मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा खराब केल्याचा आरोपही खरगे यांनी केला.
देशातील गरीबांना लुटले...
जीएसटी दरांमधील बदलांवर खरगे म्हणाले की, गरिबांना फायदा होईल अशा कोणत्याही पावलाचे काँग्रेस स्वागत करेल, परंतु त्यांनी भाजप सरकारवर वर्षानुवर्षे लोकांना त्रास देत असल्याचा आरोप केला. त्यांनी दावा केला की, आम्ही हा मुद्दा आठ वर्षांपूर्वी उपस्थित केला होता. आम्ही म्हटले होते की जर दोन स्लॅब असतील तर त्याचा फायदा गरीब लोकांना होईल, पण त्यांनी चार ते पाच स्लॅब आणले आणि लोकांना लुटले.
आम्ही राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर एकत्र आहोत
खरगे यांनी मोदींच्या पूर्वीच्या दाव्याचा उल्लेख केला अन् म्हणाले की, चीनच्या बाजूने कोणीही भारतीय हद्दीत प्रवेश केला नाही असे मोदी म्हणाले होते. मात्र, आता ते स्वतः चीनमध्ये घुसले आहेत. काँग्रेस अध्यक्षांनी यावर भर दिला की, विरोधी पक्ष राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर एकत्र आहे, परंतु ते मोदींना पाठिंब्याचा गैरवापर करू देणार नाही. आम्ही देशाच्या बाबतीत एक आहोत. म्हणून तुम्ही मनमानी पद्धतीने वागावे, असे आम्ही होऊ देणार नाही.