उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील भोगांव भागातून एक चिंताजनक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये मुसळधार पावसानंतर पाणी साचल्याने शाळकरी मुलांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत असल्याचं दिसून येतं. गेल्या काही दिवसांपासून या भागात सतत पाऊस पडत असल्याने रस्ते चिखल आणि पाण्याने भरले आहेत. या पाण्यामुळे रस्ते तलावासारखे दिसू लागले आहेत.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येतं की, शाळकरी मुलं पाणी आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यांवरून शाळेत जात आहेत. रस्ता इतका खराब झाला आहे की एक मुलगी नाल्याच्या भिंतीवरून चालत शाळेत जाण्याचा प्रयत्न करत आहे. मुलीचा तोल गेला आणि ती चिखलाने भरलेल्या रस्त्यावर पडली. तिचे कपडे आणि पुस्तके ओली झाली, पण तरीही तिने धाडस दाखवलं आणि ती उठून शाळेत गेली.
पावसानंतर अनेक घरात शिरलं पाणी
पावसानंतर दरवर्षी अशी परिस्थिती उद्भवते, परंतु प्रशासनाकडून कोणताही कायमस्वरूपी उपाय शोधण्यात आलेला नाही, असे स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. अनेक ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरलं आहे. गटारे तुडुंब भरून वाहत आहेत आणि रस्त्यांवर घाणेरडे पाणी वाहत आहे, ज्यामुळे आजारांचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम होत आहे.
पालकांमध्ये भीतीचे वातावरण
पालकांनी या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि प्रशासनाने लवकरात लवकर पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. मुलांचं शिक्षण महत्त्वाचं आहे, परंतु अशा प्रकारे जीव धोक्यात घालून शाळेत जावं लागल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.