Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 10:12 IST2025-04-30T10:11:59+5:302025-04-30T10:12:13+5:30
Bhushan Gavai Chief Justice: घरात राजकारण, समाजकारण असताना भूषण गवई यांची वागणूक, राहणीमान सामान्य राहिले. आजही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून अमरावतीला आले असताना भूषण गवई हे सामान्यातल्या सामान्य माणसाला भेटतात.

Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
नवी दिल्ली : केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे ज्येष्ठ सुपुत्र भूषण गवई यांची भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते १४ मे रोजी सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतील. विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना १३ मे रोजी निवृत्त होणार आहेत. केंद्रीय विधि मंत्रालयाने या नियुक्तीची अधिसूचना मंगळवारी जारी केली.
घरात राजकारण तरी वागणूक मात्र सामान्य
घरात राजकारण, समाजकारण असताना भूषण गवई यांची वागणूक, राहणीमान सामान्य राहिले. आजही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून अमरावतीला आले असताना भूषण गवई हे सामान्यातल्या सामान्य माणसाला भेटतात.
न्या. भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला.
१६ मार्च १९८५ रोजी वकिली व्यवसायाला सुरुवात. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी महाधिवक्ता, माजी न्यायाधीश राजा भोसले यांच्यासाेबत १९८७ पर्यंत काम केले.
१९८७ ते १९९० पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली केली.
१९९० नंतर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर वकिली केली.
ते नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील होते.
१४ नोव्हेंबर २००३ रोजी उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली.
१२ नोव्हेंबर २००५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश.
नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी येथे त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केले.