Maharashtra Election, Maharashtra Government: BJP has lost its big friend, it will cost a lot in future - Sanjay Raut | Maharashtra Government: भाजपाने आपला मोठा मित्र गमावलाय, भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागेल -संजय राऊत

Maharashtra Government: भाजपाने आपला मोठा मित्र गमावलाय, भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागेल -संजय राऊत

नवी दिल्ली - मुख्यमंत्रिपदावरून वाद विकोपाला गेल्यानंतर अखेर शिवसेना आणि भाजपामधील सुमारे ३० वर्षे जुनी युती तुटली आहे. युती तुटल्याचे निश्चित झाल्यानंतर भाजपाने संसदेत शिवसेना खासदारांची आसनव्यवस्था बदलून त्यांची विरोधी पक्षात रवानगी केली आहे. दरम्यान, भाजपाने शिवसेनेशी युती तोडून देशाच्या राजकारणातील आपला सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. भविष्यात भाजपाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा भाजपावर तोफ डागली. ‘’महाराष्ट्राचा विचार केल्यास येथे भाजपाला शिवसेने उभे केले, जागा दिली. शिवसेना ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वात जुन्या सदस्यांपैकी एक होती. मात्र आता भाजपाने शिवसेनेच्या संसदेतील खासदारांची आसनव्यवस्था बदलली आहे. भाजपाने युती तोडून आपला जुना आणि सर्वात मोठा मित्र पक्ष गमावला आहे. याची किंमत भाजपाला भविष्यात मोजावी लागेल,’’असे संजय राऊत म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासोबत युती करण्याची शिवसेनेची इच्छा नव्हती. मात्र अमित शाह मातोश्रीवर आले आणि युतीबाबत बोलणी केली. असेही राऊत म्हणाले.

यावेळी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता शरद पवार समजून घेण्यासाठी सर्वांना १०० जन्म लागतील, असे राऊत म्हणाले. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीची पत्रकारांनी चिंता करून नये.  महाराष्ट्रात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार बनणार असून ते स्थिर राहिल, असा विश्वास संजय राऊत यांनी बोलून दाखवला. 

''शिवसेना मोठा पक्ष आहे, म्हणून सरकार स्थापनेविषयी शिवसेनेला जाऊन विचारा, हे म्हणणे चुकीचं नसल्याचं राऊत यांनी म्हटले. तसेच, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही गंभीर असून राज्यातील सर्वच खासदारांनी याप्रश्नी एकत्र यावे. मोदींनी पवारांचं कौतुक केलं म्हणून काय झालं. पवार माझे गुरु असल्याचं मोदींना जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे, त्याचा राजकीय अन्वयार्थ निघत नाही. शिवसेनेच्या मनात कुठलाही गोंधळ नसून मीडियाच्याच मनात गोंधळ आहे, असे राऊत यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: BJP has lost its big friend, it will cost a lot in future - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.