गंगा स्नानावरून मल्लिकार्जुन खर्गेंचा निशाणा, आता भाजपनं दिलं खुलं आव्हान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 21:06 IST2025-01-27T21:05:19+5:302025-01-27T21:06:06+5:30
आता भाजप खासदार आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना लक्ष्य करत आव्हान दिले आहे.

गंगा स्नानावरून मल्लिकार्जुन खर्गेंचा निशाणा, आता भाजपनं दिलं खुलं आव्हान!
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील महू येथे 'जय बापू, जय भीम, जय संविधान' रॅलीला संबोधित केले. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप नेत्यांवर गंगास्नान करण्यावरून निशाणा साधला. "गंगा नदीत डुबकी मारून गरिबी धूर होणार नाही," असे खर्गे यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांचे हे विधान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्या कुटुंबासह कुंभस्नानासाठी प्रयागराज येथे गेलेले असतानाच आले आहे. यानंतर, आता भाजपने त्यांच्य या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे. भाजप खासदार आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना लक्ष्य करत आव्हान दिले आहे.
संबित पात्रांनी दिलं असं आव्हान -
मल्लिकार्जुन खर्गे यांना प्रत्युत्तर देताना भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हटले, "महाकुंभ लाखो वर्षांपासून श्रद्धेचे प्रतीक आहे. जगभरात भक्तीचा भाव आहे. असे असताना, एक राजकीय पक्ष त्याची खिल्ली उडवतो." आज खर्गे जे काही बोलले, ते अत्यंत वेदनादायक आहे. ते म्हणाले, "डुबकी मारल्याने गरिबी दूर होईल का? मी खर्गे, राहुल गांधी आणि प्रियंका यांना आव्हान देतो की, ते इतर कुठल्याही धर्माच्या श्रद्धेसंदर्भात, असे बोलू शकतात का? हजारो लोक हजला करण्यासाठी जातात. आम्ही सन्मान करतो."
"राहुल गांधींनी इटलीच्या स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारावी, पण..." -
पात्रा पुढे म्हणाले, "या प्रकारचे विधान लज्जास्पद आहे. खर्गेजींनी सनातनविरुद्ध बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ते म्हणाले होते की, सत्तेत आल्यास सनातन नष्ट करू. राहुलजी आपण इटलीत जा आणि स्विमिंग पूलमध्ये भरपूर डुबक्या मारा पण माता गंगेसंदर्भात असे भाष्य करू नका. आमच्यासाठी गंगा केवळ नदी नाही, तर माता आहे."