२७ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला पती महाकुंभमेळ्यात सापडला अशा अवस्थेत, पाहून पत्नीला बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 08:50 IST2025-01-30T08:49:47+5:302025-01-30T08:50:51+5:30
Mahakumbh 2025: कुंभमेळ्यामध्ये माणसं हरवल्याच्या किंवा सापडल्याच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. अगदी चित्रपटांमधूनही अशी अनेक कथानकं सादर झालेली पाहिली असतील. अशीच एक घटना सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामधून समोर आली आहे.

२७ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला पती महाकुंभमेळ्यात सापडला अशा अवस्थेत, पाहून पत्नीला बसला धक्का
कुंभमेळ्यामध्ये माणसं हरवल्याच्या किंवा सापडल्याच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. अगदी चित्रपटांमधूनही अशी अनेक कथानकं सादर झालेली पाहिली असतील. अशीच एक घटना सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामधून समोर आली आहे. झारखंडमधील एका कुटुंबाने प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये २७ वर्षांपूर्वी हरवलेल्या आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा शोध घेतल्याचा दावा केला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना कुटुंबीयांनी सांगितले की, १९९८ मध्ये बेपत्ता झालेले गंगासागर यादव हे आता अघोरी साधू बनले आहेत. त्यांना आता लोक बाबा राजकुमार या नावाने ओळखतात. त्यांचं वय ६५ वर्षे एवढं आहे. गंगासागर हे १९९८ मध्ये पटना येथे गेल्यानंतर अचानक बेपत्ता झाले होते. तसेचं त्यांची काही मिळत नव्हती. दरम्यान, गंगासागर हे बेपत्ता झाल्यानंतर त्यांची पत्नी धनवा देवी हिने एकटीने त्यांच्या कमलेश आणि विमलेश या दोन मुलांचं पालन पोषण केलं होतं. आता कुंभमेळ्यात पतीला अशा अवस्थेत पाहून तिला धक्का बसला आहे.
दरम्यान, गंगासागर यांचा धाकटा भाऊ मुरली यादव याने सांगितले की, आम्ही आमचा भाऊ सापडण्याची आशा सोडली होती. मात्र हल्लीच आमच्या एका नातेवाईकाने कुंभमेळ्यात एका साधूला पाहिले. तो गंगासागर याच्यासाखा दिसत होता. त्याने त्याचा फोटो काढून आम्हाला पाठवला. तो फोटो पाहून आम्ही धनवा देवी आणि त्यांच्या मुलांना घेऊन कुंभमेळ्यात पोहोचलो.
कुटुंबाने दावा केला की, बाबा राजकुमार याच्या रूपात आम्ही गंगासागर यादव यांना ओळखलं आहे. मात्र बाबा राजकुमार यांनी आपली जुनी ओळख नाकारली आहे. बाबा राजकुमार यांनी स्वत:ची ओळख वाराणसी येथील साधू अशी करून देत आपला गंगासागरशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या एका साध्वीनेही त्याला दुजोरा दिला आहे.
मात्र कुटुंबीयांनी शरीरावर असलेल्या काही खुणांचा हवाला देत ही व्यक्ती गंगासागरच असल्याचा दावा केला आहे. त्यांनी त्यांचे लांब दात, डोक्यावरील जखमेची खूण आणि गुडघ्यावर असलेला जुना घाव दाखवत सांगितले की ही तीच व्यक्ती आहे. आता या कुटुंबाने याबाबत कुंभमेळ्यातील पोलिसांची मदत मागितली आहे. तसेच ओळख पटावी यासाठी बाबा राजकुमार यांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली आहे.