"हा देश केवळ 90 लोक चालवतात, कायदे करताना..."; राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 14:41 IST2023-09-30T14:40:50+5:302023-09-30T14:41:27+5:30
राहुल गांधी म्हणाले, पैसा कुठे जाणार आणि कुणाला किती पैसा द्यायचा हे, हे 90 लोकच ठरवतात.

"हा देश केवळ 90 लोक चालवतात, कायदे करताना..."; राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
शाजापूर - हा देश केवळ 90 सचिव चालवतात. कायदे करताना किती लोकांचे मत जाणून घेतले जाते, हे आपण कुठल्याही खासदाराला अथवा आमदाराला विचारा. कायदे आरएसएसचे लोक आणि अधिकारी बनवतात. भाजपचे खासदार कायदे बनवत नाहीत. कायदा करताना एकाही खासदाराला विचारले जात नाही, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते मध्यप्रदेशातील शाजापूर येथे जन आक्रोश रॅलीत बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, पैसा कुठे जाणार आणि कुणाला किती पैसा द्यायचा हे, हे 90 लोकच ठरवतात. 90 अधिकाऱ्यांपैकी केवळ 3 अधिकारी ओबीसी आहेत. मोदीजी म्हणतात, ओबीसींची भागिदारी आहे. पण या देशात ओबीसींची लोकसंख्या किती? हे कुणाला माहिती आहे का? ओबीसींची लोकसंख्या 50 टक्के आहे, पण ओबीसी अधिकारी केवळ तीन आहेत.
आदिवासी आणि दलितांसाठी मोदी काम करत नाहीत -
राहुल गांधी म्हणाले, तीन वर्षांपूर्वी मोदी सरकारमध्ये केवळ शून्य अधिकारी होते. मोदीजी दलित, आदिवासी आणि ओबीसींसाठी काम करत नाहीत. मोदीजी केवळ सर्वसामान्यांचे लक्ष भरकटवतात. एवढेच नाही, तर भाजपवर हल्ला चढवत, हा विचारधारेचा लढा आहे. एका बाजूला काँग्रेसची विचारधारा आहे तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि आरएसएसची विचारधारा आहे, असेही राहुल म्हणाले.