उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डिफेन्स इंड्यूटियल कॉरिडोरमध्ये ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल प्रोडक्शन यूनिटचं व्हर्च्युअली उद्घाटन केलं. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कार्यक्रमात उपस्थित होते. हे युनिट दरवर्षी ८० ते १०० क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, "दहशतवाद हा कुत्र्याचं शेपूट आहे, जे कधीही सरळ होणार नाही. त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. आम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी दोनशे एकर जमीन दिली. आता येथे ब्रह्मोसचे उत्पादन सुरू होईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये तुम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद पाहिली असेल. जर तुम्ही ती पाहिली नसेल तर पाकिस्तानी लोकांना विचारा ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"
"दहशतवादाला चिरडून टाकण्याची वेळ आलीय"
"पंतप्रधानांनी जाहीर केलं आहे की, कोणतीही दहशतवादी घटना आता युद्ध मानली जाईल आणि लक्षात ठेवा की जोपर्यंत आपण दहशतवाद पूर्णपणे खात्मा करत नाही तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. आता याला चिरडून टाकण्याची वेळ आली आहे, आपण सर्वांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, संपूर्ण भारत आणि संपूर्ण उत्तर प्रदेशच्या एकत्र या मोहिमेत सामील व्हायचं आहे."
"सिंदूरच्या माध्यमातून जगाला एक संदेश दिला"
"दहशतवाद हा कुत्र्याचा शेपूट आहे, जे कधीही सरळ होणार नाही. ज्यांना प्रेमाची भाषा मान्य नाही त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची तयारी ठेवावी लागेल. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला एक संदेश दिला आहे."
दरवर्षी ८० ते १०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तयार
लखनौमध्ये सुरू झालेल्या एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीमधून दरवर्षी ८० ते १०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तयार केली जातील. याशिवाय, दरवर्षी १०० ते १५० नेक्स्ट जनरेशन ब्रह्मोस क्षेपणास्त्रे देखील तयार केली जातील. ही क्षेपणास्त्रे एका वर्षाच्या आत तयार होतील.
आतापर्यंत सुखोई सारखी लढाऊ विमाने फक्त एकच ब्रह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकत होती, परंतु आता ते तीन नेक्स्ट जनरेशन ब्रह्मोस क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम असतील. नेक्स्ट जनरेशन ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारा क्षमता ३०० किलोमीटरपेक्षा जास्त असेल आणि त्याचं वजन १,२९० किलोग्रॅम असेल, तर सध्याच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे वजन २,९०० किलोग्रॅम आहे.