हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 13:28 IST2025-11-22T13:27:22+5:302025-11-22T13:28:05+5:30
तामिळनाडूतील अलप्पुझा येथे राहणाऱ्या अवनी आणि शेरोनसोबत लग्नाच्या आधीच एक धक्कादायक घटना घडली आहे.

हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट आहे. तो दिवस खूप खास असतो. तामिळनाडूतील अलप्पुझा येथे राहणाऱ्या अवनी आणि शेरोनसोबत लग्नाच्या आधीच एक धक्कादायक घटना घडली आहे. अवनी आणि शेरोनचं लग्न शुक्रवारी, २१ नोव्हेंबर रोजी ठरलेल्या मुहूर्तावर होणार होतं. मात्र लग्नापूर्वी अवनीच्या गाडीला भीषण अपघात झाला. अशा परिस्थितीमुळे अनेकदा लग्न पुढे ढकललं जातं. मात्र शेरोनने असं होऊ दिलं नाही.
शेरोन रुग्णालयात गेला आणि अवनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून तिला आपली जोडीदार बनवलं. रुग्णालयात उपस्थित असलेल्या सर्वांसाठी हा एक भावनिक क्षण होता. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, अवनी आणि तिचं कुटुंब मेकअप करण्यासाठी कुमरकोमला जात असताना हा अपघात झाला. गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ती झाडाला जोरदार धडकली. अवनीला गंभीर अवस्थेत कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला गंभीर दुखापतींमुळे कोची येथील व्हीपीएस लेकशोर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अवनीच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे आणि लवकरच तिच्यावर सर्जरी करावी लागेल. परंतु या वेदनादायक परिस्थितीतही, अवनी आणि शेरोनने हार मानली नाही. शेरोनला अपघाताची माहिती मिळताच, तो त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह रुग्णालयात आला. सर्व नियम आणि निर्बंधांना न जुमानता रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि लग्नाला परवानगी दिली.
न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. सुदीश करुणाकरन यांच्या देखरेखीखाली आपत्कालीन विभागात शेरोनने अवनीला मंगळसूत्र घातलं. शेरोन अलप्पुझा येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर आहे. या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. फोटो व्हायरल होत आहेत. सर्वजण शेरोनचं भरभरून कौतुक करत आहेत.