lokmat parliamentary awards 2019: Modi government failed on create employment, inflation issues - shashi tharoor | Lokmat Parliamentary Awards : रोजगार, महागाईच्या मुद्द्यावर मोदी सरकार अपयशी - शशी थरूर

Lokmat Parliamentary Awards : रोजगार, महागाईच्या मुद्द्यावर मोदी सरकार अपयशी - शशी थरूर

नवी दिल्लीः मोदी सरकारला नोकऱ्या उत्पन्न करण्यात आणि महागाई नियंत्रणात अपयश आलेलं आहे. त्यामुळेच जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा विधेयकासारखे इतर मुद्दे ते उपस्थित करत आहेत. देशातली बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मोदी सरकारनं दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन मोदी सरकार पूर्ण करू शकलेलं नाही. देशात नोकऱ्यांचा मोठा तुटवडा आहे, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात शशी थरूर बोलत होते.
 
अमित शाह कोणत्याही गोष्टीचं खापर काँग्रेस आणि नेहरुंवर फोडण्याचं काम करतात अशी टीका त्यांनी केली आहे. अमित शाहांना इतिहासाचे धडे द्यावे लागतील. धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन होऊ शकत नाही, पंडित नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद यांनीही असा विचार कधीही केला नाही. 1935मध्ये हिंदू महासभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली, तर 1940मध्ये मुस्लीम लीगच्या जिना यांनी मुस्लिम राष्ट्राची संकल्पना मांडली. काँग्रेस पक्षाने कधीही धर्माच्या आधारावर राजकारण केलं नाही, असं त्यांनी सांगितले. त्याचबरोबर देशाची आर्थिक स्थिती, रोजगार या सर्व पातळीवर केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. 2014मध्ये भाजपाने जी आश्वासने दिली ती त्यांना पूर्ण करता आली नाही. रोज नवीन नवीन समस्या सरकार देशासमोर उभं करत आहे, असा आरोपही शशी थरूर यांनी केला. लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी चार सर्वोत्कृष्ट खासदारांना लोकमत संसदीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या विजेत्यांची निवड केली. जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट खासदार, सर्वोत्कृष्ट महिला खासदार, संसदेत पहिल्यांदा निवडून आलेली सर्वोत्कृष्ट महिला खासदार अशा चार श्रेणीत हे पुरस्कार दिले जातात. सोहळ्याआधी आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या भीम सभागृहात ‘राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात काँग्रेसचे खासदार शशी थरूर, असदुद्दीन ओवैसी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल सहभागी झाले असून, त्यांनी मतप्रदर्शन केलं आहे. 2017पासून या पुरस्कारांची सुरुवात झाली असून, 2018मध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, एन. के. प्रेमचंद्रन, निशिकांत दुबे, सुष्मिता देव, रमादेवी, मीनाक्षी लेखी, हेमामालिनी यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. पहिल्या वर्षी शरद पवार, सीताराम येचुरी, गुलाम नबी आझाद, जया बच्चन, कनिमोळी, रजनी पाटील, छाया वर्मा या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राज्यात ग्रामपंचायत, विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही आता पुरस्काराने गौरविले जाते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: lokmat parliamentary awards 2019: Modi government failed on create employment, inflation issues - shashi tharoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.