‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:42 IST2026-01-14T16:48:33+5:302026-01-14T17:42:14+5:30
Iran News: तणावपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने आपल्या नातेवाईकांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. सर्व भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर इराण सोडावं, अशी सूचना भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे.

‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनामुळे सध्या इराणमध्ये कमालीची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकारविरोधी आंदोलनादरम्यान हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच खमेनेई यांनी अनेक आंदोलकांना फाशीची शिक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमेरिकाही इराणविरोधात कधीही लष्करी कारवाई सुरू करेल, असे दावे केले जात आहेत. या तणावपूर्व परिस्थितीमध्ये भारतीय दूतावासाने आपल्या नातेवाईकांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. सर्व भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर इराण सोडावं, अशी सूचना भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे. तसेच हा सल्ला विद्यार्थ्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांना देण्यात आला आहे.
भारतीय दूतावासाने तेहरानमधून प्रसिद्ध केलेल्या या सूचनेमध्ये म्हटले आहे की, इराणमधील बदलती स्थिती पाहता सद्यस्थितीत इराणमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांना प्राप्त असलेल्या वाहतुकीच्या कोणत्याही साधनाच्या माध्यमातून इराण सोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
सर्व भारतीय नागरिकांनी सद्यस्थितीत इराणमध्ये राहताना सावधगिरी बाळगावी, विरोधी आंदोलन किंवा संवेदनशील ठिकाणी जाणे टाळावे. तसेच इराणमध्ये भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे आणि ताज्या घड्यामोडींबाबत जाणून घेण्यासाठी स्थानिक प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवावे, असे आवाहनही भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे.