BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 08:55 IST2025-12-03T08:50:42+5:302025-12-03T08:55:19+5:30
BHU News In Marathi: बनारस हिंदू विद्यापीठात काल रात्री विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संघर्ष झाला.

BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
बनारस हिंदू विद्यापीठात काल रात्री विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संघर्ष झाला. राजाराम वसतिगृहाजवळ सुरू झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सौम्य बळाचा वापर केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. यात अनेक विद्यार्थी, सुरक्षारक्षक आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
राजाराम वसतिगृहाबाहेर काही विद्यार्थी एका विद्यार्थ्याला मारहाण करत असल्याची माहिती सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळाली. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आणि परिसरातील फॅक्टोरियल बोर्ड काढून घेतला. या कारवाईमुळे विद्यार्थी संतप्त झाले आणि त्यांनी वसतिगृहाबाहेर निदर्शने सुरू केली. यानंतर, राजाराम वसतिगृहाबाहेर एका विद्यार्थ्याला वाहनाने धडक दिल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यामुळे विद्यार्थ्यांचा संताप आणखी वाढला आणि त्यांनी थेट कुलगुरूंच्या निवासस्थानाबाहेर धाव घेऊन जोरदार निदर्शने सुरू केली.
VIDEO | On dispute at BHU campus, ACP Gaurav Kumar says, "Some dispute happened between the students, and security guards, the situation was deteriorating, Proctor sir called us, we reached the spot, now the situation is normal... Now it is peaceful, more details will come after… pic.twitter.com/dINuRSzUmX
— Press Trust of India (@PTI_News) December 2, 2025
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या झटापटीदरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी 'सौम्य बळाचा' वापर करताच, संतप्त विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर तुफान दगडफेक सुरू केली. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये तोडफोड केली. त्यांनी एलडी गेस्ट हाऊसजवळील फुलांच्या कुंड्या फोडल्या, तसेच काशी तमिळ संगमशी संबंधित अनेक खुर्च्या आणि पोस्टर्सचीही नासधूस केली. परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याचे पाहून पोलिसांना बोलवण्यात आले.
एसीपी भेलुपूर गौरव कुमार यांनी सांगितले की, "बीएचयूमध्ये विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. परिस्थिती चिघळताना पाहून मुख्य प्रॉक्टर यांनी पोलिसांना बोलावले. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि कोणतीही समस्या नाही. हा कॅम्पसमधील अंतर्गत वाद आहे आणि त्याबद्दल केवळ प्रॉक्टरच माहिती देऊ शकतील. सध्या विद्यापीठाच्या परिसरात शांतता असून परिस्थिती सामान्य आहे."