जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 11:37 IST2025-08-30T11:35:38+5:302025-08-30T11:37:11+5:30
येथे प्रशासन आणि बचाव पथकाकडून मदत कार्यात सुरू आहे...

जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
जम्मूमधील रियासी जिल्ह्यातील माहोर येथेही मोठ्या भूस्खलनामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. या घटनेनंतर सुमारे सात लोक बेपत्ता असल्याचे समजते. याशिवाय, रामबन जिल्ह्यातील राजगड भागातही भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. येथे तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण बेपत्ता झाले आहेत. येथे प्रशासन आणि बचाव पथकाकडून मदत कार्यात सुरू आहे. या घटनेत दोन घरे आणि एका शाळेच नुकसान झाले आहे.
बांदीपोरा जिल्ह्यात ढग फुटी -
जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये शुक्रवारी (२६ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास ढग फुटी झाली. मात्र, यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच, उत्तर काश्मीर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गुरेझ सेक्टरमधील तुलैल भागातही ढगफुटी झाली. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माणण झाले होते.
४४ रेल्वे गाड्या रद्द -
उत्तर रेल्वेने शुक्रवारी, ३० ऑगस्ट रोजी जम्मू, कटरा आणि उधमपूर रेल्वे स्थानकांतून येणाऱ्या आणि सुटणाऱ्या ४६ गाड्या रद्द केल्याची घोषणा केली. मंगळवारी जम्मूमध्ये मुसळधार पाऊस आणि पूर आल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून रेल्वे वाहतूक बंद आहे. कठुआ आणि उधमपूर दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच, जम्मूमध्ये अनेक ठिकाणी रेल्वे रुळ तुटल्याने गाड्या रद्द करण्यात येत आहेत. यापूर्वी, उत्तर रेल्वेने २९ ऑगस्ट रोजी जम्मू, कटरा आणि उधमपूर रेल्वे स्थानकांतून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या ४६ गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे.
अमित शाह जम्मूत दौरा करणार -
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी (३१ ऑगस्ट) जम्मू दौरा करण्याची शक्यता आहे. या भागात झालेल्या विक्रमी पावसानंतरच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी ते या भागाचा दोन दिवसांचा दौरा करू शकतात. पावसाशी संबंधित घटनांमध्ये ११० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, यांपैकी बहुतेक यात्रेकरू होते. तर ३२ जण अद्यापही बेपत्ता आहेत. अमित शाह यांचा हा तीन महिन्यांतील दुसरा जम्मू दौरा असेल.