"मी जिवंत राहणार नाही"; वेअरहाऊसचे गेट बंद, मजूर मदतीसाठी ओरडत राहिले; ८ जणांचा मृत्यू, २१ बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 10:01 IST2026-01-27T09:55:07+5:302026-01-27T10:01:03+5:30

पश्चिम बंगालमध्ये रविवारी रात्री एका गोदामामध्ये लागलेल्या आगीत आठ जण होरपळून मृत्यूमुखी पडले.

Kolkata Fire Tragedy 8 Dead 21 Missing as Massive Fire Guts Warehouse Complex Trapped Workers Cried for Help | "मी जिवंत राहणार नाही"; वेअरहाऊसचे गेट बंद, मजूर मदतीसाठी ओरडत राहिले; ८ जणांचा मृत्यू, २१ बेपत्ता

"मी जिवंत राहणार नाही"; वेअरहाऊसचे गेट बंद, मजूर मदतीसाठी ओरडत राहिले; ८ जणांचा मृत्यू, २१ बेपत्ता

Kolkata Fire: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आनंदपूर भागात सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका मोठ्या वेअरहाऊस कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या या आगीत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून २१ मजूर अद्याप बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, बाहेरून गेट बंद असल्याने अनेक कामगार आतमध्येच अडकले आणि मृत्यूशी झुंज देताना त्यांचा करुण अंत झाला.

रविवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास आनंदपूर येथील वेअरहाऊस कॉम्प्लेक्समध्ये आग लागली. या इमारतीत एका नामांकित मोमो चेनचा कारखाना आणि एका डेकोरेटर्स युनिटचे गोदाम होते. आग लागली तेव्हा डेकोरेटर्स युनिटमध्ये सुमारे २८ मजूर आणि मोमो कारखान्यात ३ मजूर झोपलेले होते. या कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणावर थर्माकोल, पाम ऑइल, गॅस सिलेंडर आणि खाद्यपदार्थांचा साठा असल्याने आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले.

मृतांच्या किंकाळ्या आणि निष्काळजीपणा

या दुर्घटनेत प्रशासनाचा आणि मालकांचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. बेपत्ता मजूर पंकज हलदर याने पहाटे ३.३० वाजता आपल्या कुटुंबाला फोन केला होता. "फॅक्टरीचं मुख्य गेट बाहेरून बंद आहे, आम्ही भिंत तोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत, आम्हाला वाचवा," हे त्याचे शेवटचे वाक्य ठरले. गरिया येथील मौसमी हल्दर यांनी सांगितले की, त्यांच्या पतीने सकाळी ३ वाजता फोन करून मी आता जिवंत राहणार नाही, तू मला पुन्हा पाहू शकणार नाहीस, असे रडत सांगितले.

बचावकार्यात अडथळे आणि भीषण दृश्य

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ ते २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, अरुंद गल्ल्या आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आग विझवण्यास १५ तासांहून अधिक काळ लागला. ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले मृतदेह इतक्या वाईट रीतीने होरपळले आहेत की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. सध्या जेसीबी मशिन आणि रोबोटिक कॅमेऱ्यांच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

राजकारण तापले; भाजपचा टीएमसीवर हल्लाबोल

या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप आमदार आणि माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा यांनी घटनास्थळी भेट देऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. "हा कारखाना बेकायदेशीर होता का? तिथे फायर अलार्म आणि सुरक्षा व्यवस्था का नव्हती? तृणमूल सरकार अशा भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असून या लोकांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार आहे," असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

Web Title : कोलकाता गोदाम आग: आठ की मौत, कई लापता, बंद गेट में फंसे

Web Summary : कोलकाता के आनंदपुर गोदाम परिसर में भीषण आग लगने से आठ लोगों की मौत हो गई और 21 लापता हैं। बंद गेट के कारण श्रमिक अंदर फंस गए। लापरवाही का संदेह है क्योंकि पीड़ितों ने मदद के लिए बेताब कॉल किए। राजनीतिक आरोप-प्रत्यारोप शुरू।

Web Title : Kolkata Warehouse Fire: Eight Dead, Many Missing, Trapped by Locked Gate

Web Summary : A massive fire in Kolkata's Anandapur warehouse complex killed eight and left 21 missing. Workers were trapped inside due to a locked gate. Negligence is suspected as victims made desperate calls for help. Political blame game ensues.