Sanjay Roy : "२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 12:02 IST2024-09-19T11:53:19+5:302024-09-19T12:02:29+5:30
Kolkata Doctor Case And Sanjay Roy : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या ट्रेनी डॉक्टर हत्या प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे.

Sanjay Roy : "२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या ट्रेनी डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. मुख्य आरोपी संजय रॉय याच्या अटकेनंतर दोन दिवसांनी त्याचे कपडे आणि सामान जप्त करण्यात आल्याचं तपास यंत्रणेचं म्हणणं आहे. आरोपीशी संबंधीत वस्तू या गुन्हा सिद्ध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात हे माहीत असूनही कोलकाता पोलिसांनी खूप उशीर केला.
कोलकाता पोलिसांनी घटनेच्या एका दिवसानंतर १० ऑगस्ट रोजी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुख्य आरोपी संजय रॉयला अटक केली. घटनेच्या दिवशी सकाळी ४ वाजता तो रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करताना दिसला. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, "गुन्ह्यात आरोपीची भूमिका आधीच समोर आली होती, परंतु त्याचे कपडे आणि सामान जप्त करण्यात पोलिसांनी दोन दिवसांचा विनाकारण विलंब केला."
कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १४ ऑगस्ट रोजी सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. यापूर्वी कोलकाता पोलीस याचा तपास करत होते. या प्रकरणी सीबीआयने माजी प्रिन्सिपल संदीप घोष आणि तळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिजीत मंडल यांना अटक केली आहे. या दोघांवर घटनेशी संबंधित पुरावे नष्ट करून तपास वळवल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या तपासातही दोघेही सहकार्य करत नाहीत.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आणि सहआरोपींमध्ये काहीतरी कट असण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजसह दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून आरोपींची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांच्या फोनमधून काढलेल्या मोबाइल डेटाचीही तपासणी केली जाईल, जेणेकरून या प्रकरणातील कट त्यांच्यातील संभाषणातून शोधता येईल.