सापांचा राजा म्हणजे किंग कोब्रा, त्याच्याबाबतचे गेल्या १८८ वर्षांपासूनचे रहस्य संशोधकांनी उलगडले आहे. सर्वात विषारी मानल्या जाणाऱ्या या सापाच्या प्रजातींवरून अनेक समज-गैरसमज होते. ते आता दूर झाले आहेत.
किंग कोब्राच्या एक नाही तर चार वेगवेगळ्या प्रजाती आहेत, हे या सापांच्या डीएनएवरून समोर आले आहे. आतापर्यंत किंग कोब्रावर केलेल्या संशोधनात या सापाची एकच प्रजाती जी जगभरात विखुरलेली आहे, असे मानले जात होते. परंतू, डीएनए टेस्टने हे सर्व दावे फोल ठरविले आहेत. प्रत्येक ठिकाणच्या किंग कोब्राच्या शारिरीक ठेवण, रंग-रुपामध्ये फरक होता. कुठे काळा, कुठे पिवळा सोनेरी असा किंग कोब्रा होता. यामुळे हे सर्व किंग कोब्रा एकाच प्रजातीचे नसावेत असा संशय होता. तो आता दूर झाला आहे.
2021 मध्ये यावर संशोधनासाठी सुरुवात करण्यात आली. या अभ्यासात ४ प्रजाती असू शकतात असे संकेत शास्त्रज्ञांना मिळाले. पुढे संशोधन सुरु ठेवण्यासाठी शास्त्रज्ञांनी थोड्या थोडक्या नव्हे तर १५३ संग्रहालयातील किंग कोब्राच्या जतन केलेल्या नमुन्यांचा अभ्यास केला. यांचा रंग, दात, शरिराची रुंदी, लांबी याचा अभ्यास केल्यानंतर वेगवेगळ्या प्रजातींमध्ये त्यांचे वर्गीकरण केले गेले.
यानुसार नॉर्दर्न किंग कोब्रा (ओफिओफॅगस हन्ना), सुंडा किंग कोब्रा (ओफिओफॅगस बंगरस), वेस्टर्न घाट किंग कोब्रा (ओफिओफॅगस कालिंगा), लुझोन किंग कोब्रा (ओफिओफॅगस साल्वाटाना) अशा चार प्रजाती सापडल्या.