Video: 'त्या' एका व्हिडिओने घेतला दीपकचा जीव; महिला इन्फ्लुएंसरने केलेला आरोप, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:29 IST2026-01-20T12:26:13+5:302026-01-20T12:29:01+5:30
बसमध्ये चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप; मात्र व्हिडिओत असे काहीही नाही...

Video: 'त्या' एका व्हिडिओने घेतला दीपकचा जीव; महिला इन्फ्लुएंसरने केलेला आरोप, गुन्हा दाखल
कोझिकोड : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनंतर केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील 42 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपक यू असे मृत व्यक्तीचे नाव असून, एका महिला इन्फ्लुएंसरने बसमध्ये चुकीचा स्पर्ष केल्याचा आरोप करत, त्या व्यकीताचा व्हिडिओ सोशलमीडियावर पोस्ट केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.
घरातच घेतला गळफास...
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी दीपक यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 7 वाजता पालकांनी त्यांना उठवण्यासाठी दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर खोलीत दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.
Kerala man U Deepak committed suicide after being accused of sexual misconduct on a bus. Imagine the greed of women for views, she took a life.
— BALA (@erbmjha) January 19, 2026
You can clearly see it was a natural elbow movement, not assault. pic.twitter.com/rAimuCfNEy
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मानसिक तणाव
कुटुंबीयांनी सांगितले की, दीपक हे एका कापड कंपनीत काम करत होते आणि कामानिमित्त शुक्रवारी कन्नूर येथे गेले होते. त्याच दिवशी बसमधील प्रवासादरम्यान सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शिम्जीता मुस्तफा हिने चुकीचा स्पर्ष केल्याचा आरोप करत, दीपक यांचा व्हिडिओ शूट केला आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल केला.
व्हिडिओत नेमकं काय?
व्हिडिओत बसमध्ये दोघेही गर्दीत एकमेकांच्या शेजारी उभे असल्याचे दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्याला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. हा व्हिडिओ दीपक यांनी पाहिला आणि अपमान सहन न झाल्याने आत्महत्या केली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दीपक गेल्या दोन दिवसांपासून अन्नही घेत नव्हते. ते मानसिकदृष्ट्या अत्यंत अस्वस्थ होते.
वडिलांची मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी
दीपक यांच्या पालकांनी आरोप केला आहे की, ते निर्दोष होते आणि सोशल मीडियावर झालेल्या सार्वजनिक बदनामीचा मानसिक आघात सहन करू शकले नाहीत. दीपक यांच्या वडिलांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडे न्याय मागण्यासाठी तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
दरम्यान, संबंधित महिलेने व्हिडिओ हटवून त्यानंतर स्वतःची बाजू मांडणारा दुसरा व्हिडिओ पोस्ट केला होता, मात्र तोही नंतर खासगी (प्रायव्हेट) करण्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला सामान्य मृत्यूची नोंद केली आणि कुटुंबीयांचे जबाब नोंदवले. मात्र, नंतर सामाजिक कार्यकर्ते राहुल ईश्वर यांनी केरळ पोलिसांकडे तक्रार दाखल करून संबंधित महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी शिम्जीता मुस्तफाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कलम लागू केले आहे.
मानवाधिकार आयोगाची दखल
या घटनेनंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. केरळ राज्य मानवाधिकार आयोगाने (SHRC) या प्रकरणाची दखल घेतली असून, उत्तर विभागाचे डीआयजी यांना चौकशी करून एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोग 19 फेब्रुवारी रोजी कोझिकोड येथे होणाऱ्या बैठकीत या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.
दीपक यांनी स्पर्ष केलाच नाही...
विशेष म्हणजे, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी याबाबत विविध पोस्ट करुन आपला राग व्यक्त केला. संबंधित व्हिडिओमध्ये कुठेही दीपक त्या महिलेला स्पर्श करताना किंवा छेडछाड करताना दिसत नाहीत. उलट, शिम्जीता मुस्तफा दीपक यांच्या जवळ जाऊन, त्यांच्या हाताला स्पर्श करते.