अतूट प्रेम! लेकाच्या मृत्यूनंतर काही क्षणात आईनेही सोडला जीव; एकत्र काढली अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 12:53 IST2025-10-19T12:52:26+5:302025-10-19T12:53:14+5:30
ब्रेन हॅमरेजमुळे मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आईचाही मोठा धक्का बसला आणि तिचाही मृत्यू झाला.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात दिवाळीच्या एक दिवस आधी आई आणि मुलाच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रेन हॅमरेजमुळे मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आईलाही मोठा धक्का बसला आणि तिचाही मृत्यू झाला. कडाधाम पोलीस स्टेशन परिसरातील देवीगंज बाजारात ही हृदयद्रावक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुन्ना अग्रहारी हे एक व्यापारी होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कुटुंबातील सदस्यांच्या मते, ५० वर्षीय मुन्ना अग्रहारी काही दिवसांपूर्वी आजारी पडले. त्यानंतर, त्यांच्या कुटुंबाने त्यांना प्रयागराजमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. तपासात त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचं समोर आलं.
डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु शनिवारी उपचारादरम्यान मुन्ना अग्रहारी यांचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांची ७५ वर्षीय आई तारा देवी यांना अश्रू अनावर झाले. याच दरम्यान, तारा देवी यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचाही मृत्यू झाला.
आई आणि मुलाच्या एकाच दिवशी मृत्यूची बातमी कळताच देवीगंज शहरात शोककळा पसरली. कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की आई आपल्या मुलाचा मृत्यू सहन करू शकली नाही आणि त्याच दुःखात आईनेही जीव सोडला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.