"लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:23 IST2026-01-12T15:22:32+5:302026-01-12T15:23:02+5:30
अभिनेता आणि राजकारणी थलपती विजयची केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गेल्या वर्षी तमिळनाडूतील करूर येथे झालेल्या भीषण चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी केली आहे.

"लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी
अभिनेता आणि राजकारणी थलपती विजयची केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गेल्या वर्षी तमिळनाडूतील करूर येथे झालेल्या भीषण चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी केली आहे. २७ सप्टेंबर २०२५ रोजी विजयच्या TVK पक्षाने करूर जिल्ह्यात एका रॅलीचं आयोजन केलं होतं. विजय भाषणासाठी मंचावर आला असता तिथे मोठी चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ४१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. याच प्रकरणात विजय सोमवारी सीबीआयसमोर हजर झाला.
चौकशी दरम्यान सीबीआयने विजयला घटनेच्या वेळी नेमकं काय घडलं, याबाबत अनेक प्रश्न विचारले. त्यात तीन प्रश्न सर्वात महत्त्वाचे होते ते म्हणजे "तुम्ही वाहनावर उभे होतात आणि गर्दीतील लोक बेशुद्ध पडत असल्याचं स्पष्ट दिसत होतं, तरीही तुम्ही तुमचं भाषण का सुरू ठेवलं?", "काही लोक बेशुद्ध पडत असताना तुमच्याकडून गर्दीच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या जाताना दिसल्या, मग त्याच वेळी तुम्ही कोणतीही ठोस पावलं का उचलली नाहीत?", "तुम्ही सभास्थळी वेळेवर का पोहोचला नाहीत? तुमच्या उशिरा येण्यामुळे गर्दीमध्ये गोंधळ वाढला, हे तुमच्या राजकीय शक्तीचं प्रदर्शन होतं का?"
#WATCH | Delhi: TVK Chief and actor Vijay reaches Central Bureau of Investigation (CBI) office in Delhi to appear before the agency for a probe into the Karur stampede. pic.twitter.com/XE3mldMGSE
— ANI (@ANI) January 12, 2026
सीबीआय या रॅलीच्या नियोजनातील कथित निष्काळजीपणाची चौकशी करत आहे. रॅलीपूर्वी पक्षाच्या नेत्यांसोबत किती बैठका झाल्या आणि त्यामध्ये काय निर्णय घेण्यात आले, यावर एजन्सीचा भर आहे. तसेच, पोलीस आणि पक्ष यांच्यात गर्दी नियंत्रणाबाबत जो करार झाला होता, त्याचे पालन का झालं नाही, याचीही तपासणी सुरू आहे.
पाणी, सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापनात झालेल्या त्रुटींबाबत सीबीआयने रॅलीचा खर्च, पायाभूत सुविधा, वाहतूक आणि स्वयंसेवकांशी संबंधित कागदपत्रेही मागवली आहेत. थलपती विजयची ही चौकशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. तामिळनाडू सरकारने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सार्वजनिक मदत निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांना प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं.