karnataka bypoll: Twelve 'rebel' MLAs will get ministerial berth: Karnataka Minister | Karnataka bypoll: त्या बाराही 'बंडखोर' आमदारांना मिळणार मंत्रिपदाचे बक्षीस; कर्नाटक मंत्र्यांचे सूतोवाच
Karnataka bypoll: त्या बाराही 'बंडखोर' आमदारांना मिळणार मंत्रिपदाचे बक्षीस; कर्नाटक मंत्र्यांचे सूतोवाच

बेंगळुरू : कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपाने पहिला विजय नोंदविला असून 15 पैकी 11 जागांवर आघाडीवर आहे. भाजपाने येल्लापूरची जागा 31 हजार मतांनी जिंकली आहे. या 12 जागांवर काँग्रेस, जेडीएसच्या बंडखोर आमदारांनाच भाजपाने मैदानात उतरविले होते. याचा फायदा भाजपाला झाला आहे. 


कर्नाटक विधानसभेत रंगलेला सत्तासंघर्षाचा खेळ महाराष्ट्रातही रंगला होता. देवेंद्र फडणवीसांनी जशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली तशीच शपथ येडीयुराप्पांनीही दोन वर्षांपूर्वी घेतली होती. मात्र, संख्याबळ नसल्याने फडणवीसांसारखाच राजीनामाही देऊन टाकला होता. महत्वाचे म्हणजे भाजपा महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकमध्येही सर्वात मोठा पक्ष ठरला होता. नंतर येडीयुराप्पांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या 17 आमदारांना फोडले आणि त्यांना राजीनामा द्यायला लावला. यामुळे कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले आणि काँग्रेससोबतची आघाडीही तुटली. 


कर्नाटकमध्ये भाजपाला सत्ता टिकविण्यासाठी 6 जागांची गरज होती. आता 12 जागांवर आघाडीवर असल्याने भाजपाची जवळपास चिंता मिटल्यात जमा आहे. यामुळे दक्षिण भारतातील एकमेव राज्य ताब्यात ठेवण्यात भाजपाला यश येणार आहे. येडीयुराप्पांनी ही खेळी केलेली असली तरीही या 15 बंडखोर आमदारांनी भवितव्य पणाला लावले होते. यामुळे त्यांची आमदारकीही रद्द झाली होती. याचे बक्षिस या निवडून येणाऱ्या आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. 


कर्नाटकमध्ये सत्ता मिळविण्यासाठी येडीयुराप्पांनी गेल्या दोन वर्षांपासून जंगजंग पछाडले होते. एकदा मुख्यमंत्रपदाची शपथ घेतली होती. मात्र, बहुमत नसल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देत कुमारस्वामींना मुख्यमंत्री केले होते. त्यांचे सरकार रडतखडत चालेले असतानाच दीड वर्षांतच येडीयुराप्पांनी दोन्ही पक्षांच्या 17 आमदारांना फोडत सरकार पाडले होते. यानंतर कर्नाटकमध्ये पोटनिवडणूक लागली होती. हो राजकीय नाट्य जवळपास महिनाभर चालले होते. तर बंडखोर आमदारांना मुंबईमध्ये ठेवण्यात आले होते. 


दरम्यान, आजच्या पोटनिवडणुकीचे निकाल भाजपाच्या बाजुने लागत असून आघाडीवर असलेला अपक्षही भाजपाचाच बंडखोर उमेदवार आहे. चिक्कबळ्ऴापूरच्या खासदाराने त्याच्या मुलासाठी भाजपाविरोधात प्रचार केला आहे. त्याच्यावर पक्ष कारवाई करेलच, पण अन्य 12 जागांवर निवडून येणाऱ्या आमदारांना मंत्रीपद देण्याचा विचार होणार असल्याचे कर्नाटकचे मंत्री अशोक यांनी म्हटले आहे. 

Web Title: karnataka bypoll: Twelve 'rebel' MLAs will get ministerial berth: Karnataka Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.