भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:36 IST2025-07-02T17:35:24+5:302025-07-02T17:36:51+5:30
Kabaddi Player Death: एका राज्यस्तरीय कबड्डीपटूचा कुत्रा चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. ब्रजेश सोलंकी असं कबड्डीपटूचं नाव आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका राज्यस्तरीय कबड्डीपटूचाकुत्रा चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. ब्रजेश सोलंकी असं कबड्डीपटूचं नाव आहे. ब्रजेशचा मृत्यू होण्यापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो वेदनेने तडफडताना दिसत आहे. खुर्जा नगर कोतवाली परिसरात ही भयंकर घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फराना गावचा रहिवासी असलेला कबड्डीपटू ब्रजेश सोलंकीला महिनाभरापूर्वी कुत्र्याचं एक पिल्लू चावलं होतं. कुत्रा चावल्यानंतर देखील त्याने अँटी रेबीज इंजेक्शन घेतलं नाही. त्याचा हाच निष्काळजीपणा त्याच्या जीवावर बेतला आहे. नंतर त्याची प्रकृती बिघडू लागली आणि त्याच्यात रेबीजची लक्षणं दिसू लागली.
ब्रजेशची प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबाने त्याला उपचारासाठी अनेक रुग्णालयात नेलं परंतु डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला. डॉक्टरांनी सांगितलं की, आता उपचारासाठी खूप उशीर झाला आहे. यानंतर कुटुंब घरी परतलं आणि ब्रजेशचा मृत्यू झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये ब्रजेश सोलंकी बेडवर झोपला होता, तो वेदनेने तडफडत आहे. तो काहीही बोलू शकत नव्हता. लोक त्याच्या जवळच उभे आहेत. ब्रजेशमध्ये रेबीजची लक्षणं स्पष्टपणे दिसून आली. काही वेळाने त्याचा मृत्यू झाला.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात कुत्र्याचं एक पिल्लू नाल्यात पडलं. ब्रजेशने त्याला नाल्यातून बाहेर काढलं. पण तो जेव्हा पिल्लाचा जीव वाचवत होता, तेव्हा पिल्लू हाताच्या बोटाला चावलं. त्यानंतर ब्रजेशने याकडे दुर्लक्ष केलं आणि अँटी रेबीज इंजेक्शन घेतलं नाही, जे नंतर त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.