ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 11:45 IST2025-05-21T11:41:01+5:302025-05-21T11:45:07+5:30
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योती एका पाकिस्तानी आयएसआय एजंटच्या संपर्कात होती आणि भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होती.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेली हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या पोलीस कोठडीत असून, तिच्या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान ती एका पाकिस्तानी आयएसआय एजंटच्या संपर्कात होती आणि भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होती.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान महत्त्वाची माहिती पाकिस्तानला लीक?
मिडिया रिपोर्टनुसार, ज्योतीने ऑपरेशन सिंदूरसंबंधित माहिती, ब्लॅकआउट्स आणि इतर सुरक्षा हालचालींसंबंधी डेटा पाकिस्तानला पाठवल्याचे समोर आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून ती गुप्त माहिती संकलित करून, सीमेपलीकडे पाठवत असल्याचे संकेत पोलीस तपासातून समोर आले आहेत.
फॉरेन्सिक तपास सुरू
पोलिसांनी ज्योतीकडून तीन मोबाईल फोन्स आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे, ज्याचा तपास सध्या फॉरेन्सिक विभागाकडे सुरू आहे. याशिवाय, तिच्या दोन बँक खात्यांची माहितीही गोळा केली जात आहे, ज्यातून आर्थिक देवाणघेवाणी आणि परकीय संपर्क तपासले जात आहेत.
प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले आहे की, ज्योती २०२३ पासून २०२५ पर्यंत पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिश उर्फ एहसान-उर-रहीमच्या संपर्कात होती. अद्याप दोघांमधील थेट संवादाच्या स्पष्ट नोंदी मिळाल्या नसल्या तरी, ऑपरेशन सिंदूरच्या काळात संपर्क झाल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
युट्यूब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर
ज्योती मल्होत्राच्या युट्यूब चॅनेलला ३.७७ लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि तिचे इन्स्टावर १.३३ लाख फॉलोअर्स आहेत. तपास यंत्रणांना शंका आहे की, याच सोशल मीडिया प्रभावाचा वापर करून ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती.
उत्तर भारतात सक्रिय नेटवर्क
पीटीआयच्या वृत्तानुसार, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात गेल्या दोन आठवड्यांत सुमारे १२ व्यक्तींना हेरगिरीच्या आरोपांत अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये हरियाणाच्या ज्योती मल्होत्रासह पंजाबच्या गजाला नावाच्या ३१ वर्षीय महिलाचाही समावेश आहे. गजाला ही दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याच्या संपर्कात होती.