सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:20 IST2025-09-30T13:19:49+5:302025-09-30T13:20:37+5:30
एका शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या प्रेमप्रकरणाची जोरादार चर्चा रंगली आहे.

फोटो - ndtv.in
बिहारच्या जमुई जिल्ह्यात एका शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या प्रेमप्रकरणाची जोरादार चर्चा रंगली आहे. कोचिंग सेंटरमध्ये शिकत असताना एका मुलीला तिच्या शिक्षकावर जीव जडला. दोघांनी आता लग्न केलं आहे. लग्नानंतर कुटुंबियांच्या भीतीने त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आणि पोलिसांकडे मदत मागितली. जमुईच्या छठू धनामा पंचायतीत ही घटना घडली. सिंधू कुमारीने शिक्षक प्रभाकर महतोशी लग्न केलं.
शिक्षक प्रभाकर महतो हा लखीसराय जिल्ह्यातील आहे आणि विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वीच बिहार पोलिसात भरती झाला आहे. याच दरम्यान, जमुई शहरातील रहिवासी असलेली सिंधू शिक्षण घेत असतानाच सरकारी नोकरीची देखील तयारी करत होती. याच काळात दोघांची एका कोचिंग क्लासमध्ये मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
सिंधूच्या कुटुंबाला या नात्याबद्दल कळताच परिस्थिती बिघडली. ते या लग्नासाठी तयार नव्हते आणि तिचं लग्न दुसरीकडे लावत होते. गेल्या शुक्रवारी सिंधूने घर सोडलं आणि एका मंदिरात लग्न केलं. लग्नानंतर दोघांना भीती वाटू लागली की, सिंधूचं कुटुंब प्रभाकर किंवा त्याच्या कुटुंबाला त्रास देतील. म्हणूनच, सोमवारी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला.
सिंधू कुमारीने व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलं की, तिचं वय हे १८ वर्षांपेक्षा जास्त आहे आणि तिने स्वतःच्या इच्छेने प्रभाकरशी लग्न केलं. सिंधूने हात जोडून पोलीस आणि समाजाला तिचा पती प्रभाकर आणि त्याच्या कुटुंबाला त्रास देऊ नये अशी विनंती केली. प्रभाकरने व्हिडिओमध्ये तो सिंधूवर खरं प्रेम करतो आणि ते आयुष्यभर एकत्र राहतील असं सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.