भारतात Johnson and Johnson च्या सिंगल डोस Covid-19 लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 14:26 IST2021-08-07T14:24:48+5:302021-08-07T14:26:57+5:30
Coronavirus Vaccine : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली माहिती. भारतातकडे आता ५ EUA लसी असल्याचं मांडविया यांचं वक्तव्य.

भारतात Johnson and Johnson च्या सिंगल डोस Covid-19 लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला होता. सध्या दुसऱ्या लाटेचं प्रमाण काहीसं कमी झालं असलं, तरी तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर केंद्रानं मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, आता भारतात ग्लोबल हेल्थकेअर प्रमुख जॉन्सन अँड जॉन्सनच्या (Johnson and Johnson) सिंगल डोसच्या करोना प्रतिबंधात्मक लसीला मान्यता देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनरसुख मांडविया यांनी यासंदर्भातील माहिती दिली. "भारतानं आपल्या वॅक्सिन बास्केटचा विस्तार केला आहे. जॉन्सन अँड जॉन्सन च्या सिंगल डोसच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. आता भारताकडे ५ EUA लसी आहेत," असं मांडविया म्हणाले. ६ ऑगस्ट रोजी कंपनीनं माहिती देत आपल्या सिंगल डोस लसीच्या आपात्कालिन वापरास अर्ज केल्याचं सांगितलं होतं. "५ ऑगस्ट २०२१ रोजी जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेडनं भारत सरकारकडे आपल्या सिंगल डोस कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या आपात्कालिन वापरासाठी अर्ज केला होता," असं कंपनीच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं. सध्या देशात Covaxi, Covishield आणि रशियाच्या Sputnik V चे डोस नागरिकांना देण्यात येत आहेत. या तिन्ही लसींचे दोन डोस घेणं आवश्यक आहे.
Johnson and Johnson’s single-dose #COVID19 vaccine is given approval for Emergency Use in India, tweets Union Health Minister Mansukh Mandaviya pic.twitter.com/52l7zHP7qC
— ANI (@ANI) August 7, 2021
५० कोटी लसीकरणाचा टप्पा पार
देशामध्ये लसीचा डोस घेणाऱ्यांची संख्या ५० कोटींवर गेली असून एकीकडे रूग्णवाढ होत असतानाच लसीकरणाचे दिलासादायक चित्रही समोर आलं आहे. यामध्ये पहिला डोस घेणारे ३९ कोटी तर दुसरा डोस पूर्ण करणाऱ्या ११ कोटी नागरिकांचा समावेश आहे. "भारताच्या कोरोनाविषय लढ्याला मोठी प्रेरणा मिळाली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या संख्येनं ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. सर्वांना लस मोफत लस या मोहिमेखाली आपल्या नागरिकांना लस दिली जाईल आणि यात मोठ्या प्रमाणात भर पडेल अशी आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी म्हणाले होते.