नोकरी सोडा नाहीतर मरायला तयार राहा, काश्मीरमध्ये घरात घुसून दहशतवाद्यांची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 10:00 IST2018-08-01T07:54:07+5:302018-08-01T10:00:54+5:30
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कारवाया सातत्याने वाढत आहेत. आता दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांमध्ये काम करणाऱ्या काश्मिरी तरुणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

नोकरी सोडा नाहीतर मरायला तयार राहा, काश्मीरमध्ये घरात घुसून दहशतवाद्यांची धमकी
श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कारवाया सातत्याने वाढत आहेत. आता दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांमध्ये काम करणाऱ्या काश्मिरी तरुणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून त्याला नोकरी सोडण्यास सांगितले. नोकरी सोडली नाही तर जिवे मारण्यात येईल, अशी धमकी या दहशतवाद्यांनी त्याला दिली.
गेल्या तीन दिवसांत दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांवर केलेला हा तिसरा हल्ला आहे. याआधी शनिवारी पुलवामामधील त्राल परिसरात दहशतवाद्यांनी स्पेशल पोलिस अधिकारी मुदासीर अहमद लोन याचे अपहरण करून त्याला मारहाण केली होती. तसेच नोकरी सोडण्याची धमकी देऊन त्याला सोडले होते. लोन हा जम्मू काश्मीर पोलिस खात्यामध्ये आचाऱ्याचे काम करतो.
तर रविवारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील नैरा येथे सीआरपीएफ जवान नासीर अहमद यांची त्यांच्या घरी जाऊन हत्या केली होती. गेल्या काही काळात काश्मीर खोऱ्यात पोलिस कर्मचाऱ्यांचे अपहरण करून हत्या करण्याच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तर जवान आणि पोलिसांकडून हत्यार खेचणे हे नेहमीचेच झाले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये 39 सुरक्षा रक्षक, 17 सैनिक, 20 पोलीस कर्मचारी आणि दोन सीआरपीएफ जवानांची हत्या झाली आहे.