झारखंडमध्ये विरोधी पक्षातील सहा आमदारांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 03:02 PM2019-10-23T15:02:40+5:302019-10-23T15:03:47+5:30

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांमधील सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे.

jharkhand 6 opposition mlas joins bjp in presence of cm raghubar das | झारखंडमध्ये विरोधी पक्षातील सहा आमदारांचा भाजपात प्रवेश

झारखंडमध्ये विरोधी पक्षातील सहा आमदारांचा भाजपात प्रवेश

Next

रांची - झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांमधील सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. बुधवारी (23 ऑक्टोबर) सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. रांचीचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या सहा आमदारांनी भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी काँग्रेस अध्यक्ष सुखदेव भगत यांच्यासह मनोज यादव (काँग्रेस), कुणाल सारंगी (जेएमएम), जेपी भाई पटेल (जेएमएम), चमरा लिंडा (जेएमएम) आणि भानु प्रताप शाही (नौजवान संघर्ष मोर्चा) यांनी भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षाला यामुळे झटका बसला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुखदेव भगत आणि मनोज यादव आधीपासूनच भाजपाच्या रडारवर होते. भगत हे काँग्रेसचे विद्यमान पीसीसी प्रमुख रामेश्वर उरांव यांच्यावर नाराज होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभव पत्करावा लागल्यामुळेच ते उरांव यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. 

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा एकाच वेळी होईल, अशी शक्यता वाटत होती. मात्र झारखंडमधील निवडणूक ऑक्टोबरमध्ये जाहीर केली जाईल आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2020 पर्यंत आहे. 81 जागांसाठी या राज्यात निवडणूक होते. भाजपला 2014 मध्ये 37 जागा मिळाल्या होत्या. तसेच झाविमोचे 6 आमदार भाजपमध्ये गेले होते. झारखंड मुक्ती मोर्चाला 19 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्या होत्या. झारखंड विकास मोर्चाला 8 जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यातील 6 जणांनी भाजपला पाठिंबा दिल्याने केवळ दोनच जागा त्यांच्याकडे राहिल्या होत्या. भाजपाचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी झारखंडचा दौरा केला होता. 

सन 2000 मध्ये 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी झारखंडची स्थापना झाली. पहिल्या मुख्यमंत्र्यापासून आदिवासी समाजाला प्राधान्य दिल्याचे दिसते. सध्याचे झारखंड विकास मोर्चाचे सर्वेसर्वा पहिले मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी हे तेव्हा भाजपाचे मोठे नेते मानले जात होते. त्यानंतर अर्जुन मुंडा, शिबू सोरेन, मधू कोडा आणि हेमंत सोरेन हेदेखील मुख्यमंत्री राहिलेले आहेत. भाजपच्या बहुमतावर सरकार चालवणारे सध्याचे मुख्यमंत्री रघुबर दास हे पहिले बिगर आदिवासी आहेत.

 

Web Title: jharkhand 6 opposition mlas joins bjp in presence of cm raghubar das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.