Jammu & Kashmir: कलम ३७० रद्द झाल्याने काश्मीरच्या समस्या सुटतील- शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 04:56 AM2019-08-06T04:56:35+5:302019-08-06T04:57:00+5:30

मक्तेदारी, भ्रष्टाचार, बेरोजगारीच्या मुळाशी हेच कलमच अमित शहा यांचा घणाघात

Jammu & Kashmir: Kashmir problem will be resolved by cancellation of Article 2 - Shah | Jammu & Kashmir: कलम ३७० रद्द झाल्याने काश्मीरच्या समस्या सुटतील- शहा

Jammu & Kashmir: कलम ३७० रद्द झाल्याने काश्मीरच्या समस्या सुटतील- शहा

googlenewsNext

नवी दिल्ली : गेली ७० वर्षे कलम ३७०ला कवटाळून बसल्याने जम्मू-काश्मीरच्या विकासाचे वाटोळेच केले. पृथ्वीवरील हा स्वर्ग दहशतवादाच्या छायेखाली तीन कुटुंबांची मक्तेदारी बनून राहिला. भ्रष्टाचार, दहशतवादाच्या मुळाशी असलेले हे कलम रद्द केल्यानंतर, आता जम्मू-काश्मीर हे येत्या पाच वर्षांत देशातील सर्वात विकसित राज्य बनेल, असे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत या विषयावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.

कलम ३७० आणि ३५ अ हटविणे हाच काश्मीरच्या विकासाचा आणि तेथील समस्या सोडविण्याचा एकमेव उपाय असल्याचे सांगून अमित शहा म्हणाले की, या कलमांनी राज्य मागासलेले ठेवले. येथे उद्योग, पर्यटनाचा विकास होऊ शकला नाही. कलम ३७० मुळेच रक्तपात होऊन ४१ हजार ४०० जणांचे बळी गेले. आमचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांना प्राण गमवावे लागले. केंद्र सरकारने राज्यांच्या हितासाठी केलेले कायदे तेथे ३७० मुळेच लागू होऊ न शकल्याने राज्याचे नुकसानच झाले. आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा पोहोचल्या नाहीत.

जम्मू-काश्मीरमधील उद्योग, व्यवसायही तीन कुटुंबांच्याच हाती आजही आहेत. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षे होऊ दिल्या नाहीत. लोकशाही खाली झिरपू दिली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य ठिकाणी ओबीसी, दलित, आदिवासींना आरक्षण मिळू दिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रामपंचायतींच्या निवडणुका करविल्या. जे नेते काश्मीरच्या चिंतेची आवई उठवित आहेत, त्यांची मुले लंडन, अमेरिकेत शिकतात. आता कलम ३७० रद्द केल्याने जम्मू-काश्मीरची संस्कृती नष्ट होईल, अशी ओरड करणाऱ्यांनी अन्य राज्यांत हे कलम नसताना तेथील संस्कृती नष्ट झाली आहे का, असा सवाल अमित शहा यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखविल्यानेच आज कलम ३७० आणि ३५अ रद्द केले जात आहे. काँग्रेसने ती कधीही दाखविली नाही. कलम ३७०च्या आड पाकिस्तानने नेहमीच फुटीरतावाद्यांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न केले. धर्म, राजकारणाच्या पलीकडे आम्ही काश्मीर समस्येकडे पाहतो. कलम ३७० हटावे ही देशातील लाखो-करोडो लोकांची भावना आहे आणि आजच्या निर्णयाने त्याचा आदरच झाला आहे, असे अमित शहा म्हणाले.

निर्बंध लवकरच हटवू
जम्मू-काश्मीरमध्ये काही निर्बंध सध्या आणण्यात आले आहेत आणि ते सद्यस्थितीत योग्यही आहेत, असे सांगून अमित शहा यांनी योग्य वेळी ते निर्बंध हटविले जातील, अशी ग्वाही सभागृहाला दिली.

नेहरूंना केले लक्ष्य
भारतातील सहाशे संस्थाने भारतात विलीन झाली. त्याचे मोठे श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांना जाते. ही संस्थाने असलेल्या ठिकाणी कलम ३७० न आणता त्यांना भारतात आणले गेले. फक्त काश्मीरचा विषय हा पंडित जवाहरलाल नेहरू हाताळत होते आणि तिथे हे कलम आणले गेले, या शब्दात अमित शहा यांनी नेहरूंना टीकेचे लक्ष्य केले.

Web Title: Jammu & Kashmir: Kashmir problem will be resolved by cancellation of Article 2 - Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.