जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:34 IST2025-08-26T14:34:08+5:302025-08-26T14:34:40+5:30

Jammu-Kashmir Flood: धराली आणि किश्तवारनंतर डोडामध्येही ढगफुटीमुळे मोठा विध्वंस झाला आहे.

Jammu-Kashmir Flood: Cloudburst in Doda, Jammu; Four people died in the flood that came from the mountains, more than 10 houses were washed away | जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली

जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली

Jammu-Kashmir Flood: उत्तराखंडमधील धराली आणि किश्तवाडनंतर आता जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील थाथरी उपविभागात ढगफुटी झाली आहे. यामुळे १० हून अधिक घरे वाहून गेली आहेत. ढगफुटीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. कालपासून आलेल्या पूरपरिस्थितीमुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या बाधित भागात मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे.

डोंगरावरुन अचानक पूर आला
प्रशासनाने संध्याकाळपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत मदत कार्यातही अडथळा येऊ शकतो. ढगफुटीच्या घटनेनंतर परिसरात पूरसदृष्य परिस्थिती झाली आहे. दोडा येथे शेकडो झाडांसह मार्गात येणारी अनेक घरे पाण्यात वाहून गेली आहेत, तर इतर अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे स्थानिकांना आपली आयुष्यभराची कमाई गमवावी लागली आहे. 

नदीचे पाणी शहरात शिरले
या ढगफुटीचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात पाण्याचा जोरदार प्रवाह शहरात शिरल्याचे दिसते. परिसरातील नद्याही दुथडी भरून वाहत असल्यामुळे बाजारपेठाही पाण्याखाली गेल्या आहेत. अशा परिस्थितीत अपघात टाळण्यासाठी अनेक रस्ते बंद करावे लागले आहेत. प्रशासनाने बाधित भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. रामबन परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग देखील बंद करण्यात आला आहे. 

धराली आणि किश्तवारमध्ये विध्वंस
यापूर्वी उत्तराखंडमधील धराली येथे झालेल्या ढगफुटीच्या घटनेने संपूर्ण गावाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या घटनेत पाच हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण बेपत्ताही झाले होते. ढगफुटीनंतर आलेल्या पुराचे अनेक व्हिडिओ समोर आले, जे पाहून या भयानक आपत्तीचा अंदाज लावता येत होता. १४ ऑगस्ट रोजी किश्तवारमधील चाशोटी गावातही अशाच प्रकारची ढगफुटी झाली. त्या घटनेतही अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

Web Title: Jammu-Kashmir Flood: Cloudburst in Doda, Jammu; Four people died in the flood that came from the mountains, more than 10 houses were washed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.