"मी कॉन्ट्रॅक्ट जॉबवाल्याशी लग्न करणार नाही"; असं नेमकं काय घडलं की नवरीने लग्नच मोडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 10:32 IST2025-05-27T10:31:40+5:302025-05-27T10:32:21+5:30
लग्नाच्या दिवशीच एका नवरीने लग्न मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची आता सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

"मी कॉन्ट्रॅक्ट जॉबवाल्याशी लग्न करणार नाही"; असं नेमकं काय घडलं की नवरीने लग्नच मोडलं?
उत्तर प्रदेशातील जालौनमध्ये लग्नाच्या दिवशीच एका नवरीने लग्न मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची आता सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. लग्न असल्याने कुटुंबीय आनंदात होते. वाजत गाजत वरातही आली. लग्नातील काही विधीही झाले. नवरा-नवरीने एकमेकांना हार घातला पण यानंतर अचानक लग्नच मोडलं. यामागचं कारण ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला.
मुलाच्या कुटुंबाने नवरीकडच्या लोकांना मुलाला सरकारी नोकरी आहे असं खोटं सांगितलं होतं. लग्नाच्या दिवशी हार घातल्यानंतर वधूला सगळं सत्य समजलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. नवऱ्याला सरकारी नोकरी नसून कॉन्ट्रॅक्टवरची नोकरी असल्याचं समजताच तिने थेट लग्न करण्यास नकार दिला. मुलीने नकार दिल्यानंतर मंडपात एकच गोंधळ उडाला.
जालौनचे मुख्यालय असलेल्या उरई येथील रहिवासी आकाश दीपचं लग्न कदौरा पोलीस स्टेशन हद्दीतील उकुरुवा गावातील रहिवासी रामप्रकाश अहिरवार यांची मुलगी किरण हिच्याशी ठरलं होतं. आकाश हा कॉन्ट्रॅक्टवर काम करतो. लग्नासाठी सर्व पाहुणेमंडळी आली होती. याच वेळी कोणीतरी मुलीच्या कुटुंबाला नवरा कॉन्ट्रॅक्ट जॉब करतो असं सांगितलं.
नवरीला जेव्हा खोटं बोलल्याचं समजलं तेव्हा ती संतापली आणि तिने लग्न करणार नाही असं स्पष्टपणे सर्वांना सांगितलं. लग्न मंडपात बराच वेळ गोंधळ सुरू झाला. त्यानंतर आकाशने पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.