"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 14:18 IST2025-10-15T14:16:10+5:302025-10-15T14:18:01+5:30
Jaisalmer Bus Fire Accident: दिवाळीच्या सुट्टीसाठी जितेश चौहान घरी निघाले होते. त्यांनी पत्नीला कॉल केला. पण, तो कॉल शेवटचा ठरला. ज्या बसमधून ते निघाले, तीच मृत्युचे कारण ठरली.

"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
Jaisalmer Bus Fire Incident: जितेश चौहान दिवाळी कुटुंबासोबत साजरी करण्यासाठी घरी निघाले होते. पत्नीसोबत दररोज त्यांचं बोलणं व्हायचं. बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी पत्नीला कॉल केला आणि सांगितलं की, 'मी निघालोय.' काहीवेळाने वृत्तवाहिन्यांनी बसला आग लागल्याची बातमी दिली. ही तीच बस होती ज्यामधून जितेश चौहान हे प्रवास करत होते. काळजात धस्स झालं आणि नको तीच बातमी घरी धडकली. जितेश चौहान यांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. क्षणात घरातील आनंदी वातावरण आक्रोशाने हादरून गेलं.
मंगळवारी (१४ ऑक्टोबर) राजस्थानातील जैसलमेरवरून जोधपूरला जात असलेल्या एका खासगी एसी स्लीपर बसला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. बसमध्ये असलेल्या २० प्रवाशांचा जळून कोळसा झाला, तर १५ जण होरपळले गेले आहेत. जखमी असलेल्यांची प्रकतीही गंभीर आहे. याच बसमध्ये जितेश चौहानही होते.
'बसमध्ये बसलोय', ...आणि आली दुर्घटनेची बातमी
दुर्घटनाग्रस्त झालेल्या बसमध्ये बसण्यापूर्वी जितेश चौहान यांनी त्याच्या पत्नीला कॉल केला होता. दिवाळीची तयारी आणि सेलिब्रेशन याबद्दल त्यांच्यात बोलणं झालं आणि बसमध्ये बसलोय असे सांगत त्यांनी कॉल कट केला.
जितेश यांच्या घरचे बातम्या बघत होते. काही वेळाने जैसलमेर-जोधपूर मार्गावर एका खासगी बसला आग लागल्याची बातमी त्यांनी बघितली. त्याचवेळी त्यांच्या काळात धस्स झालं. त्यांनी जितेश चौहान यांना कॉल केला. त्यांचा कॉल रिसीव्ह केला जात नव्हता. त्यामुळे भीती आणखी वाढली.
पोलिसांचा कॉल अन्...
घटनेनंतर काही वेळाने जितेश चौहान यांच्या कुटुंबीयांना पोलिसांचा कॉल आला आणि ज्याची भीती होती, ती बातमीच कळली. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घाईतच कुटुंबातील लोक जोधपूरमधील रुग्णालयात पोहोचले. तिथे जखमींच्या गराड्यात कुटुंबीयांनी शोधलं, त्यांच्यामध्ये जितेश नव्हते. त्यानंतर कळलं की त्या बसमधील २० लोक होरपळून मरण पावले आहेत. त्यांच्या मृतदेहांचा जळून कोळसा झाला असून, ओळख पटवणे अवघड झाले. हे ऐकून जितेश यांच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला.
डीएनए चाचणीनंतरच मृतदेहाची ओळख पटणार
जितेश चौहान यांचे मोठे भाऊ गजेश चौहान यांनी सांगितलं की, त्याच्या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. आता डीएनए चाचणी केल्यानंतरच त्यांचा मृतदेह कोणता हे कळेल.
जितेश यांच्या घरी दिवाळीची तयारी सुरू होती. ते घरी येणार असल्याने पत्नी, मुले आणि आईवडीलही आनंदात होते. पण, एका रात्रीत सगळं बदललं. सगळे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.