नवी दिल्ली - उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून जगदीप धनखड हे सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नाहीत. ना त्यांच्याशी संपर्क होतोय, ना अधिकृत निवेदन समोर येत आहे असं सांगत राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी धनखड यांच्या सुरक्षेबाबत शंका उपस्थित केली आहे.
कपिल सिब्बल यांनी एक्सवर पोस्ट करत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना मोठा प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले की, जगदीप धनखड हे कुठे आहेत ते आम्हाला सांगितले जाऊ शकते का, ते सुरक्षित आहेत का, त्यांच्याशी संपर्क का होत नाही. गृहमंत्री अमित शाह यांना माहिती असायला हवे. ते देशाचे उपराष्ट्रपती आहेत. देशाला चिंता असायला हवी. धनखड यांनी २२ जुलैला राजीनामा दिला होता आणि ९ ऑगस्टपर्यंत त्यांची काही माहिती नाही असं सिब्बल यांनी म्हटलं.
तसेच मी पहिल्या दिवशी त्यांच्या पीएसला फोन केला होता. त्याने धनखड आराम करत असल्याचे सांगितले. त्यानंतर माझे त्यांच्याशी बोलणे नाही. ना त्यांचे लोकेशन कळतंय, ना काही अधिकृत सूचना मिळत आहे. धनखड आमचे खूप जवळचे मित्र होते. त्यांनी अनेक खटले लढलेत. जर आम्हाला एफआयआर करावी लागत असेल तर ते चांगले वाटणार नाही. तुम्ही एकीकडे बांगलादेशींना शोधत आहात, दुसरीकडे तुम्ही धनखड यांचाही शोध घ्याल असा मला विश्वास आहे. धनखड त्यांच्या अधिकृत निवासस्थानीही नाहीत. तुम्ही त्यांचा पत्ता लावा, जेणेकरून मी तिथे जाऊन त्यांची भेट घेईन असंही कपिल सिब्बल यांनी मागणी केली आहे.
प्रकृतीचे कारण देत जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा अचानक राजीनामा दिला. २२ जुलैपासून हे पद रिक्त आहे. धनखड यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२७ पर्यंत होता, मात्र मुदतीच्या २ वर्ष आधीच ते पदावरून दूर झाले. निवडणूक आयोगानेही उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबरला निवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या २१ ऑगस्टपर्यंत या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख २५ ऑगस्ट आहे. त्यात जगदीप धनखड यांच्या गायब होण्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्ली दौऱ्यावर गेलेले उद्धव ठाकरे यांनीही जगदीप धनखड कुठे आहेत असा प्रश्न पत्रकार परिषदेत केला होता.