वरिष्ठ पोलीस अधिकारी वायएस पुरन यांची गोळी झाडून आत्महत्या; पत्नी IAS अधिकारी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:05 IST2025-10-07T16:04:42+5:302025-10-07T16:05:18+5:30
IPS YS Pooran : 2001 बॅचचे IPS अधिकारी वायएस पूरन आपल्या कडक शिस्त आणि प्रामाणिकपणासाठी ओळखे जातात.

वरिष्ठ पोलीस अधिकारी वायएस पुरन यांची गोळी झाडून आत्महत्या; पत्नी IAS अधिकारी...
IPS YS Pooran : हरियाणातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सध्या ADGP पदावर कार्यरत असणारे वाय. एस. पूरन यांनी चंदीगडमधील राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेने राज्य सरकार आणि पोलीस विभागात खळबळ उडाली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूरन यांच्या पत्नी IAS अधिकारी असून, त्या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासोबत जपानच्या दौऱ्यावर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ADGP पूरन यांनी चंदीगडमधील खासगी निवासस्थानाच्या बेसमेंटमध्ये सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली. ही घटना घडली, तेव्हा घरात त्यांची मुलगी एकटीच होती. गोळीचा आवाज ऐकताच मुलगी बेसमेंटमध्ये गेली आणि वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून किंचाळत पाहेर आली. आवाज ऐकून शेजारी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची संपूर्ण तपासणी केली. अद्याप सुसाइड नोट सापडली नाही, त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे. घटनेनंतर चंदीगड पोलिसांनी परिसर सील करुन चौकशी सुरू केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, “आत्महत्येमागील खरी कारणे शोधली जात आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर पुढील माहिती स्पष्ट होईल.”
IPS पूरन यांचा परिचय
वाय. एस. पूरन हे 2001 बॅचचे IPS अधिकारी होते. सध्या ते पोलिस ट्रेनिंग कॉलेज, सुनारिया (रोहतक) येथे ADGP पदावर कार्यरत होते. त्यांची पत्नी अमनीत पी. कुमार या हरियाणा कॅडरच्या IAS अधिकारी असून, विदेश सहयोग विभागाच्या सचिव व आयुक्त आहेत. त्या सध्या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासोबत जपान दौऱ्यावर गेल्या आहेत. पतीच्या मृत्यूची माहिती त्यांना देण्यात आली असून, लवकरच भारतात परत येतील.