भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:27 IST2025-09-02T15:22:32+5:302025-09-02T15:27:19+5:30

जसबीर सिंगने पाकिस्तानला अनेक संवेदनशील माहिती पुरवली आहे. यामध्ये भाक्रा नांगल धरण, एका महत्त्वाच्या लढाऊ हवाई तळाची आणि एका मोठ्या लष्करी तळाची छायाचित्रे आणि गोपनीय माहितीचा समावेश आहे.

Information given to Pakistan from Bhakra Dam to Airbase; Chargesheet filed against famous YouTuber jasbir singh | भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल

भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल

पंजाबमधील रूपनगर जिल्ह्यातून अटक करण्यात आलेल्या युट्यूबर जसबीर सिंग याच्याविरोधात पोलिसांनी हेरगिरीच्या गंभीर आरोपांखाली १७०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांनाही मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तानला पाठवली संवेदनशील माहिती

पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, जसबीर सिंगने पाकिस्तानला अनेक संवेदनशील माहिती पुरवली आहे. यामध्ये भाक्रा नांगल धरण, एका महत्त्वाच्या लढाऊ हवाई तळाची आणि एका मोठ्या लष्करी तळाची छायाचित्रे आणि गोपनीय माहितीचा समावेश आहे. पोलीस तपासामध्ये जसबीर सिंगचे पाकिस्तानमधील सुमारे १२० लोकांशी संपर्क असल्याचे उघड झाले असून, यात अनेक आयएसआय (ISI) अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तो सतत आयएसआय एजंट शाकीरच्या संपर्कात होता, ज्याचा नंबर त्याने 'जाट रंधावा' या नावाने मोबाईलमध्ये सेव्ह केला होता.

तीन वेळा पाकिस्तान दौरा

पोलिसांनी केलेल्या तपासात असेही समोर आले आहे की, जसबीर सिंगकडे दोन पासपोर्ट होते आणि तो आतापर्यंत तीन वेळा पाकिस्तानला जाऊन आला आहे. पाकिस्तान भेटीदरम्यान त्याने अनेक हॉटेल्समध्ये आयएसआय अधिकाऱ्यांशी गुप्त भेटीगाठी केल्या.

पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांशीही संपर्क

जसबीरने एका पाकिस्तानी युट्यूबरच्या माध्यमातून दानिश नावाच्या अधिकाऱ्याशी ओळख करून घेतली. हा दानिश पाकिस्तानी दूतावासाशी संबंधित होता. जसबीर सिंग आणि दानिश यांच्या अनेक भेटी झाल्या आहेत. याशिवाय, हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा सोबत जसबीर पाकिस्तानी दूतावासात गेला होता, जिथे त्याने पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.

डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी जसबीरला अटक करण्यापूर्वी त्याने आपला लॅपटॉप आणि मोबाईलमधील बराच डेटा डिलीट केला होता. तांत्रिक टीम आता हा डिलीट केलेला डेटा परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जसबीर सिंगला जून महिन्यात ज्योती मल्होत्रासोबत पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.

Web Title: Information given to Pakistan from Bhakra Dam to Airbase; Chargesheet filed against famous YouTuber jasbir singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.