दंगलीबद्दलची माहिती असेल, तर पोलिसांना कळवा; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 14:33 IST2018-12-04T14:31:05+5:302018-12-04T14:33:08+5:30
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन दंगली घडवण्याचा कट असल्याचा दावा राज यांनी केला होता

दंगलीबद्दलची माहिती असेल, तर पोलिसांना कळवा; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला
मुंबई: राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात दंगल घडवण्याचा कट आखण्यात येत असल्याचा खळबळजनक दावा काल मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केला होता. यावर आता शिवसेनेनं प्रतिक्रिया दिली आहे. दंगलीबद्दलची माहिती असेल, तर पोलिसांना कळवा, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात दंगल घडवण्याचा कट आखण्यात आल्याचा दावा राज यांनी काल केला. ओवैसी बंधूंच्या दतीनं देशात दंगली घडवण्याचा कट आखला जात असल्याचं राज यांनी म्हटलं. हा दावा करताना राज यांनी दिल्लीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीच्या फोनचा हवाला दिला. ते विक्रोळी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. 'आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यात मोठ्या दंगली घडवण्याचं कारस्थान रचण्यात येत आहे. ओवैसी बंधूंच्या मदतीनं या दंगली घडवल्या जाऊ शकतात,' असा दावा राज यांनी केला होता. राज यांच्या दाव्याची शिवसेनेनं खिल्ली उडवली आहे. 'दंगलीच्या कटाची माहिती असेल, तर पोलिसांना त्याबद्दलची माहिती द्या,' असा टोला शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.