"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:00 IST2026-01-02T11:58:05+5:302026-01-02T12:00:14+5:30
अव्यानच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
इंदूरच्या भागीरथपुरा परिसरात दूषित पाणी प्यायल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी आणखी चार मृत्यूंची पुष्टी झाली, ज्यात एका निष्पाप बाळाचा आणि तीन वृद्धांचा समावेश आहे. शेकडो लोक अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. अव्यान असं या पाच वर्षांच्या बाळाचं नाव आहे. दुधात नळाचं पाणी मिसळून पाजल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला.
अव्यानच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आजीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही गरीब आहोत. माझा मुलगा नोकरी करतो. त्यावरच घर चालतं. आम्ही कोणावरही आरोप करू शकत नाही. देवाने आनंद दिला होता आणि पुन्हा हिरावून घेतला. अव्यानची आई वारंवार बेशुद्ध पडत आहे" अशी माहिती आजीने दिली.
"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
अव्यानचे वडील सुनील साहू एका खासगी कुरिअर कंपनीत काम करतात. दहा वर्षांच्या नवसानंतर ८ जुलै रोजी मुलाचा जन्म झाला होता. बाळ पूर्णपणे निरोगी होतं. कोणताही आजार नव्हता. पण दोन दिवसांपूर्वी त्याला ताप आणि जुलाब सुरू झाले. डॉक्टरांना दाखवण्यात आलं, औषधे दिली गेली, पण प्रकृती खालावत गेली. रविवारी रात्री प्रकृती अत्यंत गंभीर झाली. सोमवारी सकाळी रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
सुनील सांगतात की, "पाणी दूषित आहे हे त्यांना कोणीही सांगितलं नाही. ते स्वतः पाणी गाळून घ्यायचे, त्यात तुरटी टाकायचे. संपूर्ण परिसर तेच पाणी पीत होता. आईला दूध येत नसल्यामुळे आम्ही बाहेरच्या दुधात पाणी मिसळून बाळाला द्यायचो. डॉक्टरांनी सांगितलं होतं म्हणून आम्ही हेच नर्मदा नदीचे पाणी दुधात मिसळून द्यायचो. हे पाणी इतके दूषित असेल याची आम्हाला कल्पना नव्हती.
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
"बाळाला दोन दिवसांत अचानक ६-७ वेळा जुलाब झाले. आम्ही औषधही दिले. सकाळी अचानक प्रकृती बिघडली. हे पाण्यामुळे झालं आहे हे आम्हाला माहितही नव्हतं, इथल्या लोकांनी सांगितल्यावर आम्हाला सत्य समजलं." दूषित पाण्यामुळे आतापर्यंत शेकडो जण आजारी पडले आहेत, ज्यांना उलट्या-जुलाब आणि पोटाशी संबंधित तक्रारी आहेत. यापैकी आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे.