दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:15 IST2026-01-01T11:15:01+5:302026-01-01T11:15:51+5:30
५ महिन्यांच्या निष्पाप अव्यानचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला. बाळ दूध सहज पचवू शकेल, या विचाराने आईने दुधात पाणी मिसळलं होतं.

दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
इंदूरच्या भागीरथपुरा भागातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे ५ महिन्यांच्या निष्पाप अव्यानचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला. बाळ दूध सहज पचवू शकेल, या विचाराने आईने दुधात पाणी मिसळलं होतं. पण तिला कल्पनाही नव्हती की नगरपालिकेच्या नळातून येणारं पाणी तिच्या बाळासाठी 'विष' बनेल.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना भागीरथपुरा येथील रहिवासी सुनील साहू यांनी सांगितलं की, त्यांचा ५ महिन्यांचा मुलगा अव्यान याला काही दिवसांपूर्वी उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर त्याला बालरोगतज्ज्ञांकडे नेण्यात आले.
वडिलांनी सांगितलं, "डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुलावर घरीच उपचार सुरू होते. आम्ही बाजारातून दूध विकत घेऊन त्याला पाजण्यास सुरुवात केली होती. दूध खूप घट्ट असल्याने, ते बाळाला पचायला सोपे जावं म्हणून आम्ही त्यात महानगरपालिकेच्या नळाचं पाणी मिसळून देत होतो. १० वर्षांनी अव्यानचा जन्म झाला होता."
साहू यांनी असा दावा केला आहे की, दूषित पाणी पोटात गेल्यामुळे मुलाला उलट्या आणि जुलाबाचा त्रास वाढला आणि २९ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका आठवड्यात भागीरथपुरा भागात उलट्या आणि जुलाबाच्या आजारामुळे १,१०० हून अधिक लोक बाधित झाले आहेत. यापैकी सुमारे १५० रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
प्राथमिक तपासणीतून असं समोर आलं आहे की, पाईपलाईन गळतीमुळे नाल्यातील घाण पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळले, ज्यामुळे भागीरथपुरा भागात हा आजार पसरला. शहरातील भागीरथपुरा भागात दूषित पिण्याच्या पाण्यामुळे आतापर्यंत किमान ७ जणांचा बळी गेला असून १,१०० हून अधिक लोक बाधित आहेत.